देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही ; केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणारे केंद्र सरकार बरखास्त करा मात्र महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही : संजय राऊत

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या हस्तक्षेपावर टीका केली.केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का?

  मुंबई: देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर करा, महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केले पाहिजे, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले . ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.आम्ही यापुढे विरोधकांच्या आरोपांना उत्तरही देणार नाही, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.

  काय म्हणाले राऊत?

  संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या हस्तक्षेपावर टीका केली.केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

  चौकशी नंतर राजीनाम्याचा निर्णय 

  अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव प्रश्न नाही. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया निरंतर चालू राहणारी आहे. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंह यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे.

  याप्रकरणात चौकशी करून गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय घेतला पाहिजे, या भूमिकेत चूक काय आहे. केंद्रातील अनेक मंत्र्यांवरही आरोप आहेत. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सगळ्यांचेच राजीनामे घेतले तर सरकार कसे चालवणार, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.