ajay choudhary and jitendra awhad

टाटा कॅन्सर रुग्णालयाला (Tata Cancer Hospital) शंभर सदनिका देण्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड(Jintedra Awhad) यांच्या निर्णयाला शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी(Ajay Choudhari) यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

  मुंबई: कॅन्सरग्रस्तांसाठी (Cancer Patients) इथे जागा दिल्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरावा केला. पत्रे लिहिली, पण मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असा खुलासा शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.आव्हाडींनीही अजय चौधरींचे आरोप खोडून काढत स्पष्टीकरण दिले आहे.

  टाटा कॅन्सर रुग्णालयाला शंभर सदनिका देण्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

  माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत, मी असाच बोलत नाही. मला जितेंद्र आव्हाडांनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही. ज्यावेळी हा निर्णय झाला, त्यावेळी स्थानिक महिलांनी म्हाडाच्या सीईओंना घेराव घातला होता, असे अजय चौधरी म्हणाले.

  आव्हाड काय म्हणाले ?

  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेने घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणे ही दुर्दैवाची बाब आहे, असे आव्हाड म्हणाले.

  मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही. तसेच टाटा कॅन्सर रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच परवानगीनंतर घेण्यात आला होता, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर शिवसेनेचे नेते आणखी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  मी कोणतीही गोष्ट पूर्वपरवानगीशिवाय करत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली. त्यानंतर पवारसाहेब रुग्णालयात होते, ते रुग्णालयातून आल्यानंतर चाव्या देण्यााच कार्यक्रम झाला. मी घरी आल्यानंतर पहिला कार्यक्रम हाच घेऊ असं पवारसाहेबांनी म्हटलं होतं. उद्धवजीही म्हणाले पवारसाहेबांच्या हस्ते कर, पण गर्दी करु नका, ते सुद्धा तितकेच संवेदनशील होते.

  आमदार अजय चौधरी नेमकं काय म्हणाले मला माहिती नाही. कुठल्याही आमदाराची अशी तक्रार असणार नाही की मी भेट देत नाही. भेटीसाठी वेळ दिली नाही असं होणार नाही. अनेक कामं अजय चौधरींची केली आहेत.  कॅन्सर काही हवेतून पसरत नाहीत, तिथल्या लोकांचा गैरसमज दूर करु, यातून मार्ग काढू, मार्ग हा निघेलच.