अजीबात हलगर्जीपणा करु नका; मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

अंधेरीमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी ४९१ दिवस इतका आहे. तर गोरेगावमध्ये तो ५६५ दिवस व दहिसरमध्ये ५७५ दिवस आहे. १८ जून रोजी अंधेरी येथे ५२,८९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर २५ जून रोजी येथे ५३,४२३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. गोरेगाव येथे या कालावधीत ३२,६७६ तर २५ जून रोजी ३२,९५८ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. दहिसरमध्ये एका आठवड्यात १८४ रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

    मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत असताना १८ ते २५ जून या सात दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबईतील रुग्णांच्या संख्येत २८६८ ने वाढ झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, दहिसर, दादर, परळ भागांतील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.

    अंधेरीमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी ४९१ दिवस इतका आहे. तर गोरेगावमध्ये तो ५६५ दिवस व दहिसरमध्ये ५७५ दिवस आहे. १८ जून रोजी अंधेरी येथे ५२,८९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर २५ जून रोजी येथे ५३,४२३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. गोरेगाव येथे या कालावधीत ३२,६७६ तर २५ जून रोजी ३२,९५८ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. दहिसरमध्ये एका आठवड्यात १८४ रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

    ६१०पेक्षा रुग्णसंख्या अधिक असलेल्या प्रभागांमध्ये डी, आर एन, पी एस, के वेस्ट यांचा समावेश आहे. परळमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. त्यात पुन्हा वाढ होताना दिसते. १८ जून रोजी परळमध्ये १९९५८ असलेली रुग्णसंख्या २५ जून रोजी २००४० इतकी झाली आहे. रुग्णदुपटीचा कालावधी मात्र ११८३ दिवस आहे.

    संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. अमित सावंत म्हणाले, लसीकरणानंतर अनेक मुंबईकर हे निर्धास्त झाले आहेत. पर्यटन स्थळांवर गर्दी वाढत आहे. लोकांना मास्क लावणे ही सक्ती वाटते. लस घेतल्यानंतरही कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या नियमांचे पालन करायला हवे, अन्यथा सौम्य स्वरूपाचा संसर्ग होऊ शकतो. डेल्टासंदर्भात आता चर्चा होऊ लागली आहे. मात्र त्यापेक्षा गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    तिसरी लाट येईल याची चर्चा करण्यापेक्षा आता दुसरी लाट पूर्णपणे गेली का, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईमध्ये १८ जून रोजी एकूण रुग्णसंख्या ६,८५,७११ इतकी होती. २५ जून रोजी ही संख्या ६,८८,५७९ इतकी नोंदवण्यात आली आहे. मरिन लाइन्स येथील रुग्णसंख्येमध्ये इतर प्रभागांच्या तुलनेत कमी वाढ झालेली दिसते.