विधान परिषद उपसभापती पदासाठी डॉ. नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; भाजपचे भाई गिरकर रिंगणात

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची आज मंगळवारी निवडणूक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडीतून उपसभापती नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपाने भाई गिरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. परंतु , आता भाजपने ही निवडणूक होऊच नये, यासाठी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे.

विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक होऊ नये यासाठी भाजप मुंबई हायकोर्टात दाद मागणार आहे. याबद्दल भाजपच्या गोटात हालचाल सुरू आहे. खुद्द विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीच ही माहिती दिली आहे. कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थितीत केला आहे. विधानपरिषदेतील १८ जागा सध्या रिक्त आहेत. तसेच कोरोनामुळे काही सदस्य या अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यामुळे या अधिवेशनात निवडणूक घेऊ नये असा आग्रह भाजपाने धरला होता. मात्र सरकारने विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी उपसभापतिपदाचा निर्णय होईल. यामध्ये ७८ सदस्यीय विधानपरिषदेत १८ जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित ६० पैकी २३ सदस्य भाजपचे आहेत तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना १५, राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, लोकभारती १ असे ३३ आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याचे चिन्ह आहे.

दरम्यान, संसदीय कामकाज कक्ष अधिकारी याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे विधानभवनात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अधिवेशनाच्या आधीच सर्व आमदार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र अनेकांना चाचणीच्या अहवालांसाठी ताटकळत राहावं लागलं. आमदारांसह कर्मचाऱ्यांनादेखील अहवाल वेळेत मिळत नसल्याचं चित्र काल पाहायला मिळालं. या सगळ्या गलथान कारभाराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाची लागण झालेल्या एका अधिकाऱ्याचा काल विधिमंडळात मुक्त वावर असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.