आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात प्रशासकीय अधिकारी, गृह उपसचिव गायकवाड यांना समन्स

बदल्यांच्या प्रकरणात वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित व्यक्तींची माहिती दिल्यानंतर स्वीय सहाय्यकाना चौकशी करून अटक करण्यात आली आहे. तर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सोमवारी ईडीने चौकशी केली आहे. आता त्यातच गृहविभागात बदल्यांचे शासन आदेश निर्गमीत करण्याचे कामकाज करणा-या उपसचिव कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

  मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रालयात प्रशासकीय कामकाज करणा-या बड्या अधिकाऱ्यांपर्यंत सक्तवसुली संचलनालयाचा फास आवळला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आता गृहविभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनाही समन्स बजावले  असून चौकशीसाठी आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  बदल्यांसाठी मोट्या प्रमाणात वसुली

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोट्या प्रमाणात वसुली करण्यात आल्याचा जबाब केंद्रीय तपास यंत्रणाच्या ताब्यात असलेल्या सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याने दिला होता. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप देशमुख यांच्यावर ठेवला होता त्याचाच हा बदल्यांचा घोटाळा भाग होता की काय याभात सध्या चौकशी केली जात आहे.

  देशमुख यांच्या निकटवर्तीयांची चौकशी

  याबाबत सीबीआयने सुरू केलेल्या तपासाच्या आधारे ‘ईडी’ने देखील देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. त्यात ‘ईडी’ने आत्तापर्यंत संबंधित पोलीस आधिका-यांपासून देशमुख यांचे स्विय सहायक आणि सचीव तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली आहे. देशमुख यांना देखील पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.

  प्रशासकीय यंत्रणापर्यंत चौकशीचा चंचू प्रवेश

  बदल्यांच्या प्रकरणात वाझे यांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित व्यक्तींची माहिती दिल्यानंतर स्वीय सहाय्यकाना चौकशी करून अटक करण्यात आली आहे. तर, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सोमवारी ईडीने चौकशी केली आहे. आता त्यातच गृहविभागात बदल्यांचे शासन आदेश निर्गमीत करण्याचे कामकाज करणा-या उपसचिव कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणापर्यंत चौकशीने चंचू प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.