एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावं, विनोद तावडे यांचं आवाहन, पंकजा मुंडेंच्या नाराजीनंतर भाजपात काय सुरुये?

कर्नाटकात येडियुरप्पांसारख्या मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या काळात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं नाही. त्याचा फटका भाजपाला सहन करावा लागला. आता सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाजात हीच भावना आहे. खडसे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे याही सातत्यानं भाजपावर नाराजी व्यक्त करतायेत. त्यामुळं खडसे यांना पुन्हा एकदा सन्मानानं भाजपात घेण्यासाठी तावडे प्रयत्नशील आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.

  मुंबई– एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं पुन्हा भाजपात यावं, असं आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी केलंय. राज्याच्या ग्रामीण भागाची नाळ असलेले नेते अशी खडसे यांची ओळख आहे. त्यांच्यासारख्या वनेत्यामुळं खान्देशात भाजपा रुजली. त्यांनी राष्ट्रवादीत न राहता भाजपात ( BJP) यावं, असं आवाहन तावडेंनी केलंय. याबाबत पक्षश्रेष्ठी किंवा खडसे यांच्याशी चर्चा झालेली नसल्याचंही तावडे म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांचे पक्षातील प्रतिस्पर्धी अशी खडसे आणि तावडे यांची 2014 च्या फडणवीस सरकारच्या काळत ओळख होती. आता तावडे राष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा राज्यात सक्रिय होताना दिसतायेत. त्यातच त्यांनी खडसे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

  खडसेंवर अन्यायाच्या भावनेतून राष्ट्रवादीत

  देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा भाजपात ज्येष्ठ असलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. फडणवीस सरकारच्या काळात भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात त्यांचं मंत्रिपद गेलं. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे खटके उडत असल्याचंही सांगण्यात येत होतं. या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबित असतानाही तावडेंनी खडसेंना साद घातली आहे.

  कर्नाटकच्या पराभवानंतर भाजपानं घेतला धडा

  कर्नाटकात येडियुरप्पांसारख्या मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या काळात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं नाही. त्याचा फटका भाजपाला सहन करावा लागला. आता सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाजात हीच भावना आहे. खडसे यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडे याही सातत्यानं भाजपावर नाराजी व्यक्त करतायेत. त्यामुळं खडसे यांना पुन्हा एकदा सन्मानानं भाजपात घेण्यासाठी तावडे प्रयत्नशील आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.

  फडणवीस यांना शह?

  विनोद तावडे हे फडणवीसांचे प्रतिस्पर्धी मानले जात होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांना तावडेंना तिकिट नाकारण्यात आले. त्यांना राष्ट्रीय राजकारणात पाठवण्यात आलं. तावडे यांच्याकडे सध्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. अशात लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तावडे हे केंद्रात बळकट झाल्याचं मानण्यात येतंय. खडसे यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचं आवाहन करुन फडणवीसांना शह देण्याचा तावडेंचा हा प्रयत्न आहे का, अशीही चर्चा सुरुये.