विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आठ जागांसाठी लवकरच निवडणुका, महाविकास आघाडी आणि भाजपात रंगणार ‘सामना’!

या मतदार संघातील निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या या राजकीय आखाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुंबई :  विधान परिषदेच्या आठ सदस्यांची सहा वर्षाची मुदत संपत असल्याने येत्या काही दिवसांत या स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून द्यायच्या जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या विधान परिषद सदस्यांमध्ये सोलापूरचे प्रशांत परिचारक (अपक्ष), नगरचे (राष्ट्रवादी) अरुण जगताप, कोल्हापूरचे (कॉंग्रेस) राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबईतील (कॉंग्रेस) भाई जगताप, धुळे-नंदुरबारचे (भाजप) अमरिश पटेल, नागपूरचे (भाजप) गिरीश व्यास, मुंबईतील (शिवसेना) रामदास कदम, अकोला-बुलढाणा-वाशिम (शिवसेना) गोपीकिसन बाजोरिया या आठ जणांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी पूर्ण होत आहे.

    डिसेंबरमध्ये रंगणार राजकीय आखाडा

    या मतदार संघातील निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघातील पात्र मतदारांची यादी निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. डिसेंबरमध्ये रंगणाऱ्या या राजकीय आखाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पूर्वी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने मागील वर्षी भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर आता आठ जागांसाठी पुन्हा सामना होणार आहे.

    शिक्षक, पदवीधरांचा आघाडीला चांगला प्रतिसाद

    या निवडणुकीच्या निकालांचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहेत. या आठ जागांमध्ये कॉंग्रेस, शिवसेना, भाजपच्या प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीच्या एक व भाजप पुरस्कृतच्या एका जागेचा समावेश आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानतर गेल्यावर्षी झालेल्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघात आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकसा आघाडीने एकजुट दाखवली तर भाजप नवे आव्हानाला कसा सामोरे जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.