कोरोनाचे रुप बदलले तरी संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता,टाटा संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांचे अनुमान

पुढील काळात कोरोना(Corona) साथरोगाचे बदलते स्वरूप असले तरी त्यातून संसर्ग(Corona Spread Percentage) होण्याचे प्रमाण पूर्वीइतके राहण्याची शक्यता नाही, असे सकारात्मक अनुमान टाटा संशोधन संस्थेच्या(Tata Research Institute) तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

  किशोर आपटे, मुंबई : टाटा पायाभूत संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांच्या मते मे महिन्या पर्यंत कोविड-१९ च्या साथरोगाने मुंबईत जितक्या प्रमाणात सर्वाधिक रूग्णसंख्येचे शिखर गाठले आणि थैमान घातले तितक्या प्रमाणात तिसऱ्या लाटेचा प्रभाव असण्याची शक्यता नाही. मागील १७ महिन्यात देशात सुरू झालेल्या कोरोना कोविड-१९ च्या सार्स- कोव-२ विषाणूचा प्रभाव सर्वाधिक राहिला त्यामागे प्रमुख कारण ढासळलेली रोगप्रतिकारकशक्ति हे होते. मात्र पुढील काळात कोरोना(Corona) साथरोगाचे बदलते स्वरूप असले तरी त्यातून संसर्ग(Corona Spread Percentage) होण्याचे प्रमाण पूर्वीइतके राहण्याची शक्यता नाही, असे सकारात्मक अनुमान टाटा संशोधन संस्थेच्या(Tata Research Institute) तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या संशोधनाच्या मोहिमेचे प्रमुख डॉ संदिप जुनेजा यानी सांगितले की, पुन्हा संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण किती राहील यावर साथरोगाचा प्रसार अवलंबून असेल.

  प्रतिकारशक्ती पुर्वीच्या मानाने चांगली
  या संशोधकाच्या मते, गेल्या १७ महिन्यात भारतात पसरलेल्या साथ रोगाला मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक प्रामुख्याने बळी पडले आहेत. त्यातील काही दगावले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात प्रतिपिंड तयार असल्याने त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्वीच्या मानाने सुदृढ समजता यावी अशी झाली आहे. अशा रूग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण किती कमी राहिल त्यावर नव्याने साथ रोगाचा प्रसार किती प्रमाणात होणार आहे ते ठरणार आहे.

  ….तर तिसऱ्या लाटेचा सामना करणे सोपे
  मुंबईत गेल्या १७ महिन्यात २० टक्के निरोगी लोक ज्यांना एकदाही संसर्गाची बाधा झाली नाही त्यानी तातडीने किमान पहिला लसीचा डोस घेतला तर ते तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास पूर्णत: सक्षम होवू शकतात असे मत जुनेजा यांनी व्यक्त केले. ज्यांना पूर्वी किंवा गेल्या सहा महिन्यांत कोविड-१९ ची बाधा झाली होती आणि ते बरे झाले आहेत अशा नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार झाली आहेत त्यामुळे पूर्वीच्या प्रमाणात त्यांना या साथ रोगाचा सामना करणे सोपे जाणार आहे. मात्र त्या करीता नियम आणि निर्बंधांचे पालन मात्र नीट केले पाहीजे असे या तज्ज्ञांचे मत आहे.

  विषाणूची मारक क्षमता आधीपेक्षा २.२५ पट जास्त
  टिआयएफआर च्या या चमूचे प्रमुख जुनेजा आणि दक्ष मित्तल यांनी तिसऱ्या लाटेबाबतच्या अनेक शक्यतांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, ज्यांना यापुर्वी कोविड-१९ ची लागण झाली होती त्यांच्यात पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत निम्मे राहण्याची शक्यता आहे. याचे कारण डेल्टाप्लस या नव्या प्रकारच्या विषाणूची मारक क्षमता दुप्पटीने वाढल्याचे गृहित धरल्यास पूर्वीपेक्षा गतीने (२.२५ पट जास्त) तो प्रसार होवू शकतो मात्र त्यामुळे त्याच्या संसर्गाचे प्रमाण देखील जास्त असू शकते.

  …तर तिसरी लाट सौम्य राहण्याची शक्यता
  या तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त असण्याची आणखी एक शक्यता ही सांगण्यात येत आहे की, सध्या ज्या गतीने लसीकरण केले जात आहे ती फारच संथ गती आहे. जुनेजा यांनी सांगितले की, अश्या काही नकारात्मक बाबी असल्या तरी तिसऱ्या लाटेचा शिखर काळ दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी प्रमाणात येण्याची शक्यता वाढली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्या पर्यंत तिसऱ्या लाटेचा संभाव्य काळ सांगण्यात येत आहे त्यामागे चार प्रकारची कारणे असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. त्यामध्ये पुन्हा संसर्गाचे प्रमाण कमी राहिल, तरीही पुन्हा नव्या प्रकारचा कोरोना विषाणूचा उद्भव येत्या तीन महिन्यात झाला नाहीतर ही तिसरी लाट सौम्य राहण्याची शक्यता आहे.

  पुन्हा संसर्गाचे प्रमाण तिसऱ्या लाटेत कमी राहण्याची शक्यता
  टाटा संशोधन संस्थेच्या पाहणी अहवालानुसार मुंबईत मागील दुसऱ्या लाटेचा प्रभाव देशातील अन्य शहरांच्या तुलनेत कमी राहिला होता. त्यावेळी बंगळुरू आणि दिल्ली मध्ये संसर्गाचे प्रमाण अनुक्रमे २५ हजार प्रतिदिन आणि २८ हजार प्रतिदिन रुग्ण असे होते त्यावेळी मुंबईत प्रतिदिन ११हजार रुग्ण आढळून येत होते.  तज्ज्ञांच्या मते मुंबई शहराची लोकसंख्या २५ लाखाच्या घरात आहे त्यापैकी ६५ टक्के नागरीक (सुमारे १३-१४ लाख) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बाधित झाले आहेत. त्यांच्यात पुन्हा संसर्गाचे प्रमाण तिसऱ्या लाटेमध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. बंगळुरू मध्येही ४५ टक्के पेक्षा जास्त पुन्हा संसर्गाचे प्रमाण राहण्याची शक्यता नाही. दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईच्या प्रशासनाची कामगिरी चांगली राहिली आहे. मागील लाटेमध्ये मुंबईकरांच्या आरोग्याच्या आलेखाला चांगले ठेवण्यास त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तयार राहताना या लाटेचा प्रभाव कमी ठेवणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे मुंबईसाठी सोपे राहण्याची शक्यता या अहवालात शेवटी व्यक्त करण्यात आली आहे.