पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट याद्या समूह माध्यमांवर झळकल्याने मंत्रालयात खळबळ; छडा लावण्यासाठी गृहमंत्र्याचे गृहसचिवांना चौकशीचे आदेश!

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी काही महिन्यांपूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळे  आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणानी राज्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून पोलीस प्रमुखांपर्यंत अनेकांची चौकशी सुरू केली आहे.

  मुंबई : (किशोर आपटे)  राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या एका गृहमंत्र्याला पोलीसांच्या बदल्यांच्या विषयावर सध्या कारावास आणि चौकश्यांच्या फे-यांतून जावे लागत असल्याच्या भयानक वास्तवाचा सामना सरकार करत आहे. त्यातच पोलीस अधिका-यांच्या बदल्यांच्या बनावट याद्या समूह माध्यमांवर झळकल्याने मंत्रालयात खळबळ माजली आहे. सरकारच्या प्रशासनात कुणाच्या खोडसाळपणामुळे अश्या गंभीर गोष्टी होत आहेत याचा छडा लावण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यानी गृहसचिवांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

  बदल्यांमध्ये घोटाळे  आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी काही महिन्यांपूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळे  आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणानी राज्याच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून पोलीस प्रमुखांपर्यंत अनेकांची चौकशी सुरू केली आहे. तर माजी  गृहमंत्री अनिल देशमुख यांना या प्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागत आहे. इतक्या गंभीर बाबीमध्येही धक्कादायक प्रकार गेल्या दोन दिवसांपासून घडला आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी समूह माध्यमांवर फिरत असल्याचे आढळून आले आहे.

   बदल्यांचा प्रस्ताव अथवा यादी प्रसिद्ध नसल्याचे स्पष्ट

  मात्र राज्य सरकारकडून अश्या प्रकारे कोणत्याही बदल्यांचा प्रस्ताव अथवा यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी कोणामार्फत पसरवली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणी नेमका काय प्रकार आहे याची शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारने हा प्रकार गांभीर्याने घेतला असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खोलवर चौकशीचे आदेश गृहसचिवांना दिले आहेत. दरम्यान, समूह माध्यमांवर फिरत असलेल्या या बनावट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या याद्यांवर मुख्यमंत्र्याच्या मान्यतेबाबत कोणताही संदर्भ नाही.

  सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला

  या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘राज्य सरकारकडून बदल्यांची कोणतीही यादी जाहीर करण्यात आली नव्हती किंवा तसा कोणताही प्रस्ताव नव्हता. कोणीतरी खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने ही यादी समूह माध्यमांवर व्हायरल केली आहे. सहा महिन्यांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याकडून देण्यात आल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

  पवार यांचा आवाज काढत बदल्यांसंबंधी सूचना

  दरम्यान मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात एका व्यक्तीने मंत्रालयात फोन करत हुबेहूब शरद पवार यांच्यासारखा आवाज काढत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी काही सूचना दिल्या होत्या. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने खातरजमा करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा सगळा बनावट फोनचा प्रकार उघड झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने आता या विषयावर चौकशी करण्याचा निर्णय घेतेला आहे.