मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे किडनी विकारांमध्ये वाढ होण्याची भीती ?

वाहतूककोंडीमुळे अनेकांना वाहनांमध्ये सलग चार ते सहा तास प्रवास करावा लागत असून या काळात नागरिकांना लघवी विसर्जित करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना मूत्रविकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय तज्ञांच्या मते रोजच्या वाहतूककोंडीचा प्रवास हा किडनीचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे.

 मुंबई – मिशन बिगिन अंतर्गत (Mission  Begin Again) २ सप्टेंबरपासून सर्व प्रकारची दुकाने, ऑफिस, गॅरेज वर्कशॉप व इतर उद्योगधंदे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून सुरु केले आहेत. रिक्षा टॅक्सी तसेच बससेवा (Bus Service) सुरु झाल्या असल्या तरी मुंबई लोकल (Mumbai Local) व मेट्रो (Metro)बंद असल्यामुळे वाहतुकीचा ताण हा रस्ते मार्गावर येत असून अनेक नागरिकांना रस्त्यावरील महाभयंकर वाहतूककोंडीमुळे शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई, पनवेल ठाणे, भिवंडी व पालघर येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांची नोकरीधंद्याची नाळ मुंबईला जोडली गेली असल्यामुळे येथील नागरिक रोज ४ ते ५ तासाचा प्रवास करून आपल्या कार्यालयात पोहचत आहेत. वाहतूक कोंडीमुळे कोरोनाचे संकट तर आहेच परंतु यांसोबत इतर शारीरिक व्याधी वाढत आहेत.

वाहतूककोंडीमुळे अनेकांना वाहनांमध्ये सलग चार ते सहा तास प्रवास करावा लागत असून या काळात नागरिकांना लघवी विसर्जित करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना मूत्रविकाराच्या आजारांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय तज्ञांच्या मते रोजच्या वाहतूककोंडीचा प्रवास हा किडनीचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे मूत्रविकारतज्ञ व शल्य चिकित्सक डॉ. निशांत काठाळे सांगतात, ” मूत्रपिशवी म्हणजेच ब्लॅडर हा अत्यंत संवेदनशील अवयव असून जेंव्हा ब्लॅडर मध्ये लघवी साठते तेंव्हा लघवी उत्सर्जनासाठी आपल्या मेंदूला एक इशारा दिला जातो, लघवी केल्यानंतर हा वाढलेला ब्लॅडर आपल्या पूर्व पदावर येतो, परंतु अनेकवेळा ब्लॅडर लघवीने भरलेला असेल व मूत्र विसर्जन झाले नाही तर हा अवयव आपली संवेदनशीलता गमावतो.

भारतातील अनेक महिला ज्या नोकरी धंद्यानिमित्त अनेक वेळ बाहेर राहतात व अनेक कारणांमुळे लघवी जास्त वेळ रोखून धरतात त्यामुळे त्यांना मूत्रविकार होतात. मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. तुम्ही युरिन कितीकवेळ रोखून धऱतात हे युरीन किती तयार झाली यावर अवलंबून असते. तुम्ही जितके जास्त वेळ तुम्ही तुमची लघवी रोखून धरता तितके बॅक्टेरिया मूत्रप्रणालीमध्ये अधिक विकसीत होण्याची शक्यता असते. मूत्र साठविण्याची पिशवी भरली की लघवीची जाणीव होते लघवीची जाणीव झाल्यावर पुढील २० ते ३० मिनिटात मिनिटात ती विसर्जित होणे आवश्यक असते .

कधीही जोरात आलेली लघवी थांबवू नका, जेव्हा लघवी लागल्या सारखी वाटले तेव्हा लगेच विसर्जित करा, नाही तर यूटीआय ( युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन) होण्याचा धोका असतो. मूत्रमार्गातील इन्फेक्शन हे किडनीतही प्रवेश करू शकतात. एकदा का ब्लॅडरचे आरोग्य बिघडले तर ते सामान्य होण्यास बराच अवधी लागतो.” किडनीचे आरोग्य व मधुमेह याविषयी अधिक माहिती देताना माय डायाबिटीस क्लीनिकचे संचालक व मधुमेहतज्ञ डॉ. जयदीप शिंदे सांगतात, “मधुमेह, उच्च-रक्तदाब, किडनीचे विकार, हृदयरोग यासारखे आजार कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमुख कारण म्हणून पुढे आले. तरुणांची रोगप्रतिकारक शक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत चांगली असते. त्यामुळे तरुणांना कोरोनापासून जास्त धोका नाही, असा अनेकांचा गैरसमज झालेला असू शकतो. मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा उलट आहे.

जुलै व ऑगस्टच्या आकडेवारी नुसार राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. आजही भारतामध्ये निदान न झालेल्या मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, म्हणजेच आपल्याला मधुमेह झाला आहे याची जाणीव अनेकांना ५ ते ६ वर्षानंतर होते व या कालावधीत मधुमेह शरीराचे मुख्यतः किडनीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान करतो म्हणून या कोरोना संक्रमणाच्या काळात किडनीचे आरोग्य जपले पाहिजे. मधुमेह आणि उच्च-रक्तदाब हे सायलेंट किलर्स आहेत. याची लक्षणं लवकर समजून येत नाहीत. लोकांना आपल्याला मधुमेह, उच्च-रक्तदाब आहे हे माहिती नसते. साधारणत: तरुण असताना आपण जास्त तपासणी करत नाही. त्यामुळे तरूणांमध्ये मधुमेह, उच्च-रक्तदाब यांसारख्या आजाराचे निदान करणे राहून जाते.