ट्रॅव्हल बसचालकांना सतावतेय लॉकडाऊनची चिंता, पुन्हा धंद्यावर संक्रांत येण्याची भीती

२०२० च्या शेवटी जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, तेव्हा हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागला. आता कुठे हा व्यवसाय रुळावर येऊ पाहत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या शक्यतेने या व्यवसायातील मालक, चालक आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता पुन्हा हा व्यवसाय बंद झाला, तर जगायचं कसं, असा प्रश्न त्यांना सतावू लागलाय. 

    गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घटकांचे हाल झाले. खाजगी ट्रॅव्हल बसचालक हा त्यापैकीच एक घटक. प्रवासच बंद झाल्यामुळे ट्रॅव्हल चालकांचा धंदा अक्षरशः ठप्प झाला. जवळपास ९ महिने त्यांचा व्यवसाय बंद होता.

    २०२० च्या शेवटी जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली, तेव्हा हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय पुन्हा उभारी घेऊ लागला. आता कुठे हा व्यवसाय रुळावर येऊ पाहत असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या शक्यतेने या व्यवसायातील मालक, चालक आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता पुन्हा हा व्यवसाय बंद झाला, तर जगायचं कसं, असा प्रश्न त्यांना सतावू लागलाय.

    गेल्या वर्षी २२ मार्चपासून ट्रॅव्हलचा व्यवसाय बंद झाला. महाराष्ट्रातील जवळपास हजारो ट्रॅव्हल्सचा व्यवसाय त्यानंतर ठप्प झाला होता. या व्यवसायावर गुजराण करणारी शेकडो कुटुंब महाराष्ट्रात आहेत. अनेकांनी नव्या बस विकत घेतल्या आहेत. त्यासाठी लाखो रुपयांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात बस एका जागी उभ्या राहिल्याने करायचे काय, असा प्रश्न त्यांना सतावू लागला होता.

    सध्या महाराष्ट्रातील विविध भागात अंशतः लॉकडाऊन आहे. कोरोना रुग्णांचा आकडा असाच वाढत राहिला, तर राज्यभर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल बसचालकांची चिंता वाढत चालली आहे. गाड्यांना भाडे मिळत नसल्यामुळे कर्जाचे हफ्ते कसे भरायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय.