वनअधिकारी दिपाली चव्हाण यांची आत्महत्या की हत्या? विशेष तपास पथक नेमून प्रकरणाची चौकशी करा : प्रविण दरेकरांची मागणी 

मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आपल्या कामाची छाप सोडणार्‍या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. कच्या रस्त्यावरून पायी फिरायला लावणे, सुट्टी न देणे, पगार रोखून धरणे, अशा प्रकारे एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा छळ केला जात होता. 

  मुंबई : गर्भवती असलेल्या वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी  आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे सरकारने  आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील तातडीने एसआयटी स्थापन करून गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

  अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

  अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन क्षेत्रात कार्यरत दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  याच सुसाईड नोटचा, नातेवाईकांच्या आरोपांचा संदर्भ घेऊन दरेकर यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

  प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा

  मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आपल्या कामाची छाप सोडणार्‍या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. कच्या रस्त्यावरून पायी फिरायला लावणे, सुट्टी न देणे, पगार रोखून धरणे, अशा प्रकारे एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा छळ केला जात होता.

  ही घटना महाराष्ट्राला, राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अटक करून त्यांना निलंबित करा. दीपाली चव्हाण यांची हत्या झाली असल्याचाही संशय या प्रकरणात व्यक्त केला जात असल्यामुळे या प्रकरणाची शासनाने तातडीने गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असून प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर प्रकरणातील महत्त्वाचे साक्षी, पुरावे नष्ट केली जाण्याची दाट शक्यता आहे.

  त्यामुळे अटक करण्यात आलेल्या उपवनसंरक्षक यांना तातडीने सेवेतून निलंबित करावे, संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे व आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशाही मागण्या दरेकर यांनी या पत्रात केल्या आहेत.