मुंबईतील माजी महिला पत्रकाराने ७ वर्षांच्या मुलासह बाराव्या मजल्यावरून मारली उडी, दोघांचा जागीच मृत्यू – सुसाईड नोटमधून कारण आले समोर

चांदिवलीच्या (Chandivali) नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीमध्ये रेश्मा(Suicide) ही महिला राहत होती. तिथेच तिने इमारतीमधून मुलासह बाराव्या मजल्यावरून उडी मारली.

    मुंबई: शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका माजी महिला (Former Journalist Allegedly Jumped) पत्रकारानं आपल्या ७ वर्षाच्या मुलासह बाराव्या मजल्यावरून उडी  घेऊन आत्महत्या (Suicide)केली आहे. चांदिवलीच्या (Chandivali) नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीमध्ये रेश्मा ही महिला राहत होती. तिथेच तिने इमारतीमधून मुलासह बाराव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत रेश्मा आणि तिच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

    रेश्मा हिचा पती सैराट मुलुकुतला २३ मे रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ४४ वर्षीय रेश्मा ट्रेंचिल ही नैराश्यात (Depression) होती. सैराट हा शेतीसंबंधित वस्तूंच्या ऑनलाईन व्यापार यात मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम करत होता.साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

    रेश्मानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये रेश्मानं त्याच इमारतीत राहणाऱ्या आयुब खान यांच्या कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केलेत. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आयुब खानला अटक करण्यात आल्याचे समजते.

    रेश्मा आणि तिचा पती आपला मुलगा याच्यासह १० एप्रिल रोजी नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते. मुलाच्या आवाजाच्या होणाऱ्या त्रासासंबंधी आयुबच्या कुटुंबियांनी याआधी इमारतीच्या सोसायटीकडे तक्रार दाखल केली होती.रेश्माच्या मुलाच्या खेळण्यावरही त्यांचा आक्षेप होता. वारंवार वेगवेगळ्या कारणावरून आयुब खान आणि त्यांचे कुटुंबीय रेश्माला त्रास देत होते. तिने आपल्या एक फेसबुक पोस्टमध्येही आपल्याला बिल्डिंगमधील शेजाऱ्यांचा त्रास होत असल्याचे म्हटले होते.

    या घटनेनंतर विभागीय पोलीस आयुक्त महेश्वर रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त (अंधेरी) यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रेश्माच्या एका पानाच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी कुटुंबाविरोधात FIR नोंदवला आहे. ही घटना सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली.