Fraud of Rs 9 lakh per person, claiming to get a job in Central Excise Department

केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून एका व्यक्तीची 9 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. मुंबईतील माझगाव परिसरातील पीडित तक्रारदाराला ९ लाख रुपयांना फसवणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या भायखळा पोलिसांनी अटक केली आहे.

    मुंबई : केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून एका व्यक्तीची 9 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. मुंबईतील माझगाव परिसरातील पीडित तक्रारदाराला ९ लाख रुपयांना फसवणाऱ्या २ आरोपींना मुंबई पोलिसांच्या भायखळा पोलिसांनी अटक केली आहे.

    या प्रकरणी विरार येथून पी. ए. पाडावे व पुणे परिसरातून डी. के. पांचाळ या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतले.
    या प्रकरणातील पीडित तक्रारदार एच. डी. कुळे यांनी त्यांच्या मुलासाठी व जावयासाठी सरकारी खात्यात नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान त्यांच्याच एका नातेवाईकाने पी. ए. पाडावे यांची सरकारी खात्यात चांगली ओळख असल्याचे सांगून त्यांच्यातर्फे जावई व मुलाला नोकरी मिळवून दिली जाऊ शकते, असे सांगितले.

    एच.डी कुळे यांनी त्यांची भेट घेतली असता प्रत्येकी ८ लाख रुपये दिल्यास केंद्रीय उत्पादन शुल्क खात्यामध्ये नोकरी मिळेल, असे या भामट्यांनी एच. डी. कुळे यांना सांगितले. तडजोड करत प्रत्येकी ७ लाख रुपये देण्याचे ठरले. २०१८ मध्ये एच. डी. कुळे यांनी दोन्ही आरोपींना ९ लाख रुपये दिले.

    काही महिन्यानंतर यातील दोन्ही उमेदवारांना आरोपीने पुण्यात बोलून त्यांची भरती प्रक्रियाबद्दल फॉर्म भरून बनावट नेमणूक पत्र सुद्धा दिले होते. मात्र, नंतर कामाच्या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. यासंदर्भात एच. डी. कुळे यांनी २१ जून रोजी भायखळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.