ganesh immersion

विध्नहर्त्या मंगलमूर्ती गणरायाच्या दहा दिवसांच्या मूर्तींचे उद्या रविवारी अनंत चतुर्दशी दिनी भक्तीमय वातावरणात विसर्जन हाेणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झालीय. विसर्जनादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 45 हजार पाेलीसांचा ताफा मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  मुंबई : विध्नहर्त्या मंगलमूर्ती गणरायाच्या दहा दिवसांच्या मूर्तींचे उद्या रविवारी अनंत चतुर्दशी दिनी भक्तीमय वातावरणात विसर्जन हाेणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झालीय. विसर्जनादरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 45 हजार पाेलीसांचा ताफा मुंबईत तैनात करण्यात येणार आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  मुंबईच्या शहर आणि उपनगरातील पालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सुमारे २५ हजार इतके कामगार मूर्तींच्या विसर्जनासाठी तैनात केले आहेत. १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त पालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून, याठिकाणी महापालिने चाेख व्यवस्था केली आहे. चौपाट्यांसह विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

  अशी आहे व्यवस्था

  ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा आणि साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

  कडक सुरक्षा व्यवस्था

  काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर असणार आहे. पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

  काेराेनाच्या नियमांचे पालन आवश्यक

  साेशल डिस्टंन्सिंग, स्वच्छता ठेवून आराेग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  मार्गदर्शक सूचना

  सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार, फुलांचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी.
  घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
  सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

  घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी लसींचे २ डोस घेतलेले असावेत, दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.

  घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.
  विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क वापरणे बंधनकारक असेल. शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

  सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. सामाजिक अंतर पाळावे. विसर्जना दरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास, पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे. सन २०२१ च्या गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

  मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

  नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा. महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

  मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे. घर, इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

  बृहन्‍मुंबई महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भादवि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.