गारगाई प्रकल्पाचे काम धिम्या गतीने, १० वर्षापासून प्रकल्प रखडलेलाच

आदान मनोर्‍याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे २ कि.मी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र धरण बांधण्याचे काम शिल्लक आहे. हे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे.

मुंबई –  वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गारगाई प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्याने पाणी प्रकल्प गेल्या १० वर्षापासून रखडला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईला ४४० दशलक्ष पाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई आणि पिंजाळ असे दोन पाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ हा प्रकल्प गारगाई नदीवर होणार आहे. गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे धरण बांधले जाणार आहे. आदान मनोर्‍याचे बांधकाम तसेच गारगाई ते मोडकसागर जलाशयादरम्यान अंदाजे २ कि.मी लांबीच्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र धरण बांधण्याचे काम शिल्लक आहे. हे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे हाती असल्याने गारगाई प्रकल्पाला विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गारगाईचे काम पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र हे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबईला ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. गारगाई जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयात आणून तिथून जलवाहिनीद्वारे मुंबईत आणले जाणार आहे. सुमारे ३ हजार कोटींहून अधिक खर्च या प्रकल्पाला येणार आहे.