नक्षलग्रस्त भागांचा विकास करण्यासाठी राज्याला १२०० कोटींचा निधी द्या – मुख्यमंत्री

    नवी दिल्ली : नवी दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी राज्याला १२०० कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याचे सूत्रांची माहिती आहे.

    दरम्यान या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नक्षलग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी सांगितलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागांत कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबतची आकडेमोड गृहमंत्र्यांसमोर मांडली. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्ता भागांत शाळा जास्तीत जास्त कशा वाढवता येतील, त्या भागांत सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अनेकदा नेटवर्कच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यासाठी या भागांत जास्तीत जास्त मोबाईल टॉवर्स उभारण्याची गरज असल्याचं सांगितलं. या दोन गोष्टींमुळे या भागांत खूप उपलब्धता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    दरम्यान, सध्या महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि चंद्रपूरसारख्या भागांमध्ये नक्षलवादाची समस्या प्राकर्षाने दिसून येत आहे. या भागांमध्ये विकास कामांना गती देण्यास केंद्राचे तसेच राज्याचे प्राधान्य आहे. मात्र आता नक्षलवादाची समस्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण होऊ शकते, अशी भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या गंभीर मुद्द्यावर केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करण्याची गरज असून पुढील वाटचाल कशी असावी? यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्राकडून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं होतं.

    सकाळी १० वाजता ही बैठक सुरु झाली होती. या बैठकीसाठी देशभरातील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालकही यावेळी उपस्थित होते.