निवडणुकीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती द्यावी, अन्यथा निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी नेते आक्रमक

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावरून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेले दिसत आहे.

    मुंबई : सध्या मराठा आरक्षण, पदोन्नतीस आरक्षण आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावरून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झालेले दिसत आहे.

    दरम्यान कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुकीच्या निर्णयाला सरकारने स्थगिती द्यावी. अन्यथा ओबीसींच्या रोषाला सामोरं जावं, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे. तर या सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

    निवडणूक आयोगाने काल जाहीर केला, हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. या निर्णयाचा ओबीसी समाज निषेध करतो. कोरोनामुळे या निर्णयाला स्थगिती दिली होती पण आता हा निर्णय लागू केला, विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन देऊनही हा निर्णय आला हे धक्कादायक आहे, असं प्रकाश शेंडगें यांनी सांगितलं आहे.

    दरम्यान, पंढरपूरच्या दिंड्यांची परवानगी नाकारता मग निवडणुकांना परवानगी कशी देता, असा सवाल प्रकाश शेंडगेंनी विचारला आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका होऊ देणार नाही, जेलभरो आंदोलन करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.