राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावीः डॉ. राजू वाघमारे

राजू वाघमारे या संदर्भात म्हणाले की, या योजनेनंतर सामाजिक न्याय खात्याच्या अनेक योजना आल्या व त्यानुसार अनुदानित आश्रमशाळा, अंध, अपंग, मूकबधिर योजनेतील शाळांच्या वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी लागू झाली आहे परंतु राजर्षी शाहू योजनेतील हे कर्मचारी आजही समान काम समान वेतनापासून वंचित आहेत, त्यांना सरकारी नियमानुसार वेतन मिळणे आवश्यक आहे.

    मुंबई : राज्यातील सर्वात जुन्या राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतिगृह योजनेतील वसतीगृहात काम करणाऱ्या ८००० कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचटणीस व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

    कर्मचारी समान काम समान वेतनापासून वंचित

    राजू वाघमारे या संदर्भात म्हणाले की, या योजनेनंतर सामाजिक न्याय खात्याच्या अनेक योजना आल्या व त्यानुसार अनुदानित आश्रमशाळा, अंध, अपंग, मूकबधिर योजनेतील शाळांच्या वसतीगृह कर्मचाऱ्यांना वेतणश्रेणी लागू झाली आहे परंतु राजर्षी शाहू योजनेतील हे कर्मचारी आजही समान काम समान वेतनापासून वंचित आहेत, त्यांना सरकारी नियमानुसार वेतन मिळणे आवश्यक आहे. २५ वर्षांपासून सातत्याने या घटकाला न्याय देण्याची मागणी केली जात असताना अद्यापही ती मान्य झालेली नाही.

    उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

    या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबधीत खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर बैठक घेण्यास सांगतो व तिथून प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करून सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन दिले असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. या योजनेतील हजारो कर्मचारी आज अगदी तटपुंजा पगारात काम करून हलाखीचे जीवन जगत आहेत. शासनाने सरकारी वेतनश्रेणी लागू केल्यास त्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा विश्वासही डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.