मोठी बातमी ! राज्यपाल नियुक्त जागांबाबतचा तिढा अखेर सुटणार?

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील (Rajani Patil) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त (Governor appointed MLC ) १२ जणांच्या यादीतून त्यांचे नाव आता कमी होणार आहे.

    मुंबई : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील (Rajani Patil) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त (Governor appointed MLC ) १२ जणांच्या यादीतून त्यांचे नाव आता कमी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवाय राज्यपालांनी आक्षेप घेतलेल्या काँग्रेसच्या दोन आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एक सदस्याला वगळून त्याऐवजी नवी नावे देण्याबाबत आघाडीच्या तीनही पक्षात लवकरच बैठक घेवून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्यपालांसोबत गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यपाल नियुक्त जागांबाबतचा तिढा देखील सुटण्यास मदत होणार असल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

    चार नावे वगळून नवा प्रस्ताव

    मागील काही दिवसांत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या विधीमंडळ नेत्यांनी राज्यपालांशी भेट घेत १२ सदस्यांच्या यादीला मंजूरी देण्याबाबत चर्चा केली होती. यावेळी राज्यपालांकडून कॉंग्रेसच्या सचिन सावंत आणि अविनाश वणकर तर राष्ट्रवादीच्या यशपाल भिंगे आणि शिवसेनेच्या नितीन बानगुडे पाटील यांच्या नावाला मंजूरी देण्यास आक्षेप असल्याचे सांगण्यात आले होते, अशी या सूत्रांची माहिती आहे.

    पर्यायी पाच नावांचा प्रस्ताव

    त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांचा तिढा सुटण्यासाठी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्र्याकडून रजनी पाटील यांच्याऐवजी नवीन नावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी घेवून नवी यादी पाठविताना त्यात आक्षेप असलेल्या अन्य चार जणांची नावे देखील वगळून पर्यायी नवीन नावे देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समन्वय समिती समोर असल्याचे या सूत्रांनी सांगितले. येत्या आठवड्यात यावर चर्चा होऊन नवीन नावे निश्चित करण्यात येतील आणि राजभवनाकडे नव्या यादीचा प्रस्ताव पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.