नियम पाळा लॉकडाऊन टाळा ; आरोग्यमंत्र्यांकडून जुन्या घोषणेचा पुनरूच्चार

नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढत राहीली तर नाईलाजास्तव पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा अशा जुन्या घोषणेचा पुनरूच्चार टोपे जनतेला करत आहेत.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होणार की नाही? यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. विरोधी आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी तसेच पक्षांनी लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढत राहीली तर नाईलाजास्तव पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा अशा जुन्या घोषणेचा पुनरूच्चार टोपे जनतेला करत आहेत.

    राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत चर्चा अद्यापही सुरू आहे. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध आणत आहोत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

    कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, २७ हजार ९१८ इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरत आहे.