परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी; जनहित याचिका कशी त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

  मुंबई (Mumbai).  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेची दखल घेत सदर याचिका जनहित याचिका कशी ? त्याबाबत खुलासा करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देत खंडपीठाने सुनावणी बुधवारी निश्चित केली.

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परमबीर सिंह यांच्यावतीने उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. राज्याच्या गुप्तचर विभागाच्या गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस खात्यात होत असलेला भ्रष्टाचार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये होत असलेली पैशांची मागणी याविषयी २४-२५ ऑगस्ट २०२० रोजीच राज्याचे तत्कालीन पोलिस महासंचालकांना माहिती दिली होती.

  त्यानंतर सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत हॉटेल व्यवसायिकांकडून खंडणी गोळा कऱण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्र्यांकडूनच होत असलेल्या या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिका जनहित याचिका कशी त्याबाबत खुलासा करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देत बुधवारी तातडीने सुनावणी निश्चित केली आहे.

  इतर याचिकांवर एकत्रित सुनावणी
  दरम्यान, परमबीर सिंह आणि देशमुख प्रकरणाची सीबीआय अथवा ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. मात्र, ‘प्रथमदर्शनी या याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी दाखल करण्यात आल्याचे सांगत खंडपीठाने आपली नाराजी व्यक्त केली. तसेच या याचिकेतील मथळा हा कॉपी पेस्ट केल्यासारखा भासत असल्याचेही त्यांनी याचिकाकर्त्यांना सुनावले.

  यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मुंबई पोलिसांत दिलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे. तसेच याप्रकरणात अन्यही काही याचिका दाखल केल्या आहेत. तसेच स्वत: परमबीर सिंह यांनीही यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली असल्याचे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितलं. त्याची दखल घेत सर्व याचिका एकत्र करून सुनावणी घेण्याचे ठरल्यास त्यासंदर्भात रितसर अर्ज करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देत खंडपीठाने या याचिकेवर 1 एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.