Heritage Tourism' in Mumbai Municipal headquarters to be open for tourism; Review by Aditya Thackeray

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जानेवारीपासून मनपा मुख्यालयाच्या हेरिटेज इमारती पर्यटनासाठी खुल्या करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या तयारीचा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत रविवारी आढावा घेतला, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत देशभरातून पर्यटक येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी येतात. ही इमारत केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटक-सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. अनेक पर्यटकांना मुख्यालय आतून पाहण्याची उत्सुकता असते. ही बाब लक्षात घेऊन, तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालय खुले करण्याचा निर्णय घेतला.

पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार ऑक्टोबरमध्ये केला. जानेवारीपासून पर्यटकांना ती खुली केली जाणार असल्याने पालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. यावेळी पालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकारी, खाकी टूर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर पालिकेची चार मजल्यांची मुख्यालयाची दगडी इमारत आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर गाईडच्या मदतीने ही इमारत पर्यटकांना पाहता येईल. एमटीडीसीने खाकी टूर्स प्रा. लिमिटेड या खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. ही संस्था पर्यटकांकडून सशुल्क दर आकारणार आहे.

मुख्यालयात काय पाहता येणार

मुख्यालयाच्या इमारतीत महापौर दालन, पालिका आयुक्तांचे कार्यालय, विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. यात मुंबईतील २३२ नगरसेवकांसाठी असलेले मुख्य सभागृह, त्यातील महापुरुषांचे पुतळे, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे. आधुनिकतेचा साज म्हणून इमारतीत लिफ्ट आणि वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र, वास्तूच्या कोणत्याही रचनेत बदल न करता ही वास्तू जपण्यात आली आहे. इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे तर समोरच सेल्फी पॉईंट आहे.

फोटो आणि लघू व्हिडीओतून काय पाहणार

सात तलावांतून सुमारे दिडशे किलोमीटर अंतरावरुन मुंबई शहराला होणारा पाणी पुरवठा, रस्ते, दर्जेदार आरोग्य सेवा, पालिका शिक्षणपध्दत, पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा, विस्तारीत मुंबईचा इतिहास, प्रसिध्द वस्त्रोद्योग, इतर हेरिटेज इमारती आणि स्थळांचे महत्व, शहरातील विविध मानवनिर्मित व नैसर्गिक वारसा चिन्हांचा इतिहास फोटो आणि लघू व्हिडीओद्वारे दाखविण्यात येणार आहेत.