परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये गृहमंत्र्याच्या विरोधात केलेत ‘हे’  आरोप

तब्बल आठ पानाचे हे पत्र असून निलंबित वाझेना पुन्हा पोलीस दलात समाविष्ट करून घेतल्यानंतर दिलेल्या टार्गेटची माहिती यात देण्यात आली आहे. यातील अनेक गोष्टींचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे 

  मुंबई: परमबीर सिंह यांची पोलिस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्या पत्रात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. तब्बल आठ पानाचे हे पत्र असून निलंबित वाझेना पुन्हा पोलीस दलात समाविष्ट करून घेतल्यानंतर दिलेल्या टार्गेटची माहिती यात देण्यात आली आहे.

  दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांना मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अनिल देशमुख म्हणाले होते की, “परमबीर सिंह यांची बदली रुटीन नव्हती. एनआयएच्या तपासात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांकडून काही अक्षम्य चुका झाल्या ज्या माफ करण्यासारख्या नव्हत्या.”

  याच मुलाखतीचा उल्लेख करत परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, “सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं.

  त्यानंतर वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले. आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

  वाझेंना टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास १ हजार ७५० बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून २-३ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी ४०-५०कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील सांगण्यात आले होते.

  टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

  सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदेही उपस्थित होते.

  मी जेव्हा वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एव्हढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असे मला दिसून आले.

  यातील अनेक गोष्टींचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे