घरवापसीमुळे २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

भाई जगताप म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थिती बघता सध्या काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जाते. कोरोना काळात काँग्रेसचे काम पाहिले तर आगामी निवडणुकीत आम्ही एकटे लढू, देखते है किसमे कितना है दम, असेही भाई जगताप म्हणाले.

    मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी मंत्री सुनील देशमुख यांनी  घरवापसी करत पक्षप्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा केला.

    काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनीही काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे मत व्यक्त केले.

    देखते है किसमे कितना है दम

    भाई जगताप म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थिती बघता सध्या काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जाते. कोरोना काळात काँग्रेसचे काम पाहिले तर आगामी निवडणुकीत आम्ही एकटे लढू, देखते है किसमे कितना है दम, असेही भाई जगताप म्हणाले.

    मात्र याबाबत पक्षात आता मतभेद असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. पक्ष प्रभारी एच के पाटील यांनी याबाबत निर्णय घेण्याची चर्चा करण्याची ही वेळ नाही, योग्य वेळी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे म्हटले आहे.

    पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळे तिकीट मिळाले नाही

    तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा केला. ते म्हणाले की, काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत.  काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या सुनील देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले.

    मी भाजपमध्ये गेलो पण तालुक्यातील सर्व सहकारक्षेत्र माझ्याकडे असताना मला तिकीट नाकारण्यात आले. मी कोणाचे नाव घेत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पक्षात वर्चस्व असल्याने मला तिकीट मिळाले नाही, अशी टीका सुनील देशमुख यांनी केली.

    भाजपचा दुटप्पी चेहरा

    भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. राज्यात भाजपची सत्ता येईल, असे वाटल्यामुळे अनेकजण तिकडे गेले. पण आता या नेत्यांची भाजपमध्ये अडचण होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.