एसटी कर्मचारी आझाद मैदानावर कसे करताहेत आंदोलन! मन हेलावून टाकणारी कर्मचाऱ्यांची व्यथा, नक्की वाचा ‘नवराष्ट्र ग्राऊंडं रिपोर्ट’

गावाखेड्यातून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान येथे आला आहे. गावावरुन आलेला हा एसटी कर्मचारी मात्र, आझाद मैदानात अत्यंत हालाखीचे दिवस काढत आहे. १५ दिवसापासून हा कर्मचारी काय खात आहे? पीत आहे? यांच्या जेवणाची सोय काय आहे? यांची गावाकडील कशी परिस्थिती आहे? महिन्याला किती पगार मिळतो यांना? यांच्या कुटुंबाचं काय? मुलांचं काय? खर्च कसा करतायेत? किती महिने पगार नाही? अशा विविध समस्यांच्या नवराष्ट्रने मांडलेला हा 'ग्राऊंडं रिपोर्ट'

  मुंबई : सध्या राज्यात सर्वांत चर्चिला जाणारा विषय म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचे आदोलन! आपले विलिनीकरण राज्य शासनात व्हावे यासाठी, यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. एकिकडे एसटी संपामुळं प्रवासांचे हाल होत असताना, दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांचे सुद्धा मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावाखेड्यातून एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदान येथे आला आहे. गावावरुन आलेला हा एसटी कर्मचारी मात्र, आझाद मैदानात अत्यंत हालाखीचे दिवस काढत आहे. १५ दिवसापासून हा कर्मचारी काय खात आहे? पीत आहे? यांच्या जेवणाची सोय काय आहे? यांची गावाकडील कशी परिस्थिती आहे? महिन्याला किती पगार मिळतो यांना? यांच्या कुटुंबाचं काय? मुलांचं काय? खर्च कसा करतायेत? किती महिने पगार नाही? अशा विविध समस्यांच्या नवराष्ट्रने मांडलेला हा ‘ग्राऊंडं रिपोर्ट’

  जगणं मुश्किल झालंय

  राज्यात मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यभरातून चालक, वाहक, महिला आणि पुरुष कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी करुन घेतले आहे. मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या अस्तावेस्त पडलेलं साहित्य, बॅगा, आंथरुण हे पाहून खरंच मनाला प्रश्न पडतो की, सरकार पण एवढे ताणून का धरत आहे. ते योग्य आहे का? “जर जास्तच ताणले तर, तुटते” या ताणाताणीमुळं अनेक कर्मचाऱ्यांचे जीवन (आत्महत्या) तुटले आहे, अनेकांनी आत्महत्येचं टोकाच पाऊल उचलत, आपली जीवनयात्रा संपवली आहे.

  या ऐतिहासिक आझाद मैदानावर हे कर्मचाऱ्यांचे अत्यंत हालाखीचे दिवस काढत आहेत. उन्हा-ताणाहात येथे आता अधिक काळ राहणे खूप अवघड होत आहे, डोळ्यात झोप आहे, पण डासांमुळं झोप लागत नाहीय, पोटात भूकेची आग आहे, पण ती शमविण्यासाठी पुरेसं अन्न नाही. आणि पोटात पुरेसं अन्न नसल्यामुळं परिणामी कित्येक कर्मचारी आजारी पडले आहेत. डॉक्टरांकडे जायला जवळ पैसे नाहीत, मैदानावरील अनेक कर्मचाऱ्यांनी तर, पंधरा दिवसापांसून आंघोळी सुद्धा केली नाहीय. दिवसागणिक मैदानावरील परिस्थिती खूप भयावह होत चाललेली आहे. त्यामुळं इथं राहयचं कसं आणि जगायचं कसं असा प्रश्न आता या कर्मचाऱ्यांना पडला आहे. पुरुष एकवेळ कसे तरी राहू शकतो, पण महिलांची हालत खूप वाईट होत आहे, यातच काही महिला आजारी सुद्धा पडल्या आहेत. त्यामुळं इथलं सध्या वातावरण खूप गंभीर आणि मन हेलावून टाकणारं आहे.

  “मागील दोन दिवसांपासून पाऊस जास्त पडत आहे, त्यामुळं सर्व सामान भिजले असून, अंगावरील कपडे सुदधा अंगावरच भिजून पुन्हा सुकले आहेत. झोपायचे आंथरुण, बॅगा, मोबाईल फोन आदी साहित्य भिजले आहे. तर पावसामुळं डास अधिक झाले आहेत, त्यामुळं डोळ्यात झोप असून सुद्धा डास झोपू देत नाहीत, त्यामुळं मायबांप सरकारनं लवकर तोडगा काढावा, असं पांडूरंग जाधव यांनी सरकाराला साद घातली आहे.” येथील विदारक चित्र पाहिल्यानंतर हे लोक पंधरा दिवसापासून इथं कसे काय राहत असतील? असा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाहीय. “आम्ही इथं मागील १५ दिवसांपासून आंदोलन करत आहोत, आलेला दिवस ढकलत काढायचा आणि उद्याच्या दिवसाची वाट बघायची, पोटाच्या आगीची भ्रांत आहेत, ही भ्रांत चोहोबाजूला आशेने दूरपर्यंत नजर फिरवते, त्या नजरेत कुणाकडून काही मिळेल, अशी भाबड्या आशेवर आम्ही दिवस ढकलत आहोत, असं इथले एसटी कर्मचारी दतात्रय अस्वले (आजरा, कोल्हापूर) आणि एकनाथ सुळे (अकलूज, सोलापूर) यांनी आपली व्यथा सांगितली आहे.” ही व्यथा ऐकताना कुणाचेही मन हेलावून जाईल, ह्दय पिळवटून जाईल, अशी भयाण परिस्थिती सध्या मैदानावर आहे.

  कमी पगारात घर कसे चालवायचे?

  या आंदोलनात राज्यभरातून कर्मचारी सहभागी झाले आहेत, त्यामुळं आझाद मैदानावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी सहभागी झाले आहेत. “मी मागील वीस वर्षापासून एसटीत काम करत आहे, सध्या मला २० हजार पगार आहे, आणि माझ्या हातात १२ हजार पगार येतोय, त्यामुळं घर चालविणे अवघड झाले आहे, कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा? माझे कुटुंब गावी असते, दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे, यात मुलांच्या शाळेचा खर्च आला, घरगुती खर्च त्यामुळं १२ हजारात घर कसे चालवायचे? घर चालविणे खूप अवघड होतेय, अशी आपली व्यथा दतात्रय अस्वले, (आजरा, कोल्हापूर) यांनी मांडली आहे,”

  तर “एकनाथ सुळे हे अकलूज, सोलापूर या एसटी डेपोट मागील १५ वर्षापासून काम करत आहेत, तर त्यांना फक्त २० हजार रुपये पगार आहे. मागील तीन चार महिन्यापांसून पगार मिळाला नाहीय, वीस हजारातून कापून, हातात १६-१७ हजार पगार येतो, मी घरी एकटात पैसै कमविणारा आहे, त्यामुळं घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. महिन्याचा किराणा खर्च, यात मुलांचा खर्च, घरात कोण तरी आजारी असते, यामुळं एवढ्या कमी पगारात खायचं काय? आणि घर कसे चालवायचे? असा प्रश्न आम्हाला पडला आहे, त्यामुळं आमच्या मागण्या सरकारनं मान्य करुन विलिनीकरण करावे अशी भावनिक साद एकनाथ सुळे यांनी सरकारला घालत आपली व्यथा मांडली आहे”

  तर या आंदोलनात महिला कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. अक्कलकोट येथून कुंभार या महिला कर्मचारी सहभागी झाल्या आहेत. “मी मागील १२ वर्षापासून एसटीत काम करत आहे, पगार फक्त १२ हजार आहे, या कमी पगारात घर कसे चालवायचे, मी सध्या एकटीच आली आहे, माझे कुटुंब म्हणजे दोन मुले आणि पती गावी आहेत, माझ्या पगारावर माझे कुटुंब अवलंबून आहे, येथे आम्हाला गावाकडून भाकरी, जेवण येत आहेत ते आम्ही खात आमच्या मागणीवर ठाम आहोत, आणि आंदोलन करत आहे, असं एसटी महिला कर्मचारी कुंभार मॅडम यांनी आपली कळकळ सांगितली आहे.”

  उपासमारी, शिळे जेवण आणि पाऊस

  १५ दिवसांपासून हे कर्मचार आंदोलन करत असल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुंबईत नाहीत, त्यामुळं कर्मचाऱ्यांना गावावरुन भाकरी किंवा जेवण येत आहे, किंवा “काही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ह्या कधी-कधी जेवण वाटप करतात, पण ते पुरसे नसते. पण ज्या दिवशी जेवण नसते, त्या दिवशी कर्मचारी यांना उपासमारीला सामोरी जावे लागते. त्यामुळं अनेक महिला आणि पुरुष आजारी पडले आहेत. जवळ पैसे नसल्यामुळं उपचार सुद्धा करु शकत नाही. काही कर्मचारी गावावरुन आपल्या कुटुंबसोबत आल्यामुळं गावावरुन जेवणाची आशा पण मावळली आहे. परिणामी उपासमारी आणि शिळे जेवण पदरी पडत आहे, असं अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.” मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळं सर्व जमीन ओली झाली आहे, त्यामुळ पाठीचा कणा टेकवण्याच्या आधार सुद्धा पावसाने हिरावून घेतला आहे. डास आणि पोटातील आग झोपू देत नाहीत.

  मैदानावरच खाणे, पिणे आणि झोपणे

  या आंदोलनात हजारो महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत, यातील कर्मचारी याच आझाद मैदानावर झोपतात, तर अनेकांनी आंघोळीची सोय नाही आहे, झोपायची कुठेही सोय नसल्यामुळं हे कर्मचारी याच मैदानावर झोपतात. अनेकांनी गावावरुन आपले कुटुंब बरोबर आणले आहे, ते सुद्धा याच मैदानावर रात्र दिवस राहत आहे. दुसरे कुठे राहयची सोय नसल्याने ते मैदानावरच राहत आहेत. काही संस्था, राजकीय पक्ष तुटपुंजे जेवण कधी तरी देतात, पण ते पोटभर नसते, त्यामुळं सध्या मिळेत ते खाणे, पिणे आणि झोपणे हे मैदानावर आहे.

  कर्मचाऱ्यांची सरकारला आर्त हाक

  राज्यात मागील १५ दिवसांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यभरातून चालक, वाहक, महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांनी आपले कुटुंब यांना सुद्धा या आंदोलनात सहभागी करुन घेतले आहे. लहान मुलं, महिला, पुरुष घरातील कर्ता पुरुष सगळेच आंदोलनात सहभागी झाल्यामुळं सगळ्यांचीच उपासमार होत आहे, १५ दिवसांपासून खूप हालाखीत आणि वाईट परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी दिवस काढले आहेत, त्यामुळं सरकार मायबापने अधिक आमचा अंत न पाहता, आमची मागणी मान्य करुन, विलिनिकरण करावे अशी आर्त हाक इथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या कर्मचाऱ्यांचे सरकारनं म्हणणे ऐकून यातून लवकर तोडगा काढावा, अधिक ताणले तर, हे कर्मचारी टोकाची भूमिका सुद्धा घेण्याची शक्यता आहे. अद्यापर्यंत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. सध्या ऐतिहासिका आझाद मैदानावरी या कर्मचाऱ्यांची अवस्था, परिस्थिती पाहून खूप भावनिक व्हायला होते, मन हेलावून जाते, आणि मुखातून आपसूपणे उद्गार निघतात…हे थांबले पाहिजे आणि लवकरात लवकर संप मिटला पाहिजे, कारण है मैदानावरील भयानक चित्र या डोळ्यांनी पाहवत नाहीय.