अतिवृष्टीने विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड नुकसान: केंद्राकडून किमान ७ हजार कोटींच्या मदतीची अपेक्षा

विदर्भ  मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणीसह विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यात  शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीनसह, कापूस, ऊस पिकांचे नुकसान झाले आहे.

    मुंबई :  विदर्भ  मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणीसह विदर्भातील बुलडाणा, अकोला, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यात  शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीनसह, कापूस, ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही विदर्भ मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केल्याचे सांगत केंद्र सरकारने अधिक मदत करण्याची मागणी केली आहे.

    एनडीआरएफचे निकष बदलून मदत देण्याचा प्रयत्न

    माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल मी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात होतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी मदत देण्यात येते ते नियम जुने आहेत. त्यामुळे त्यात बदल करुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

    केंद्राकडून किमान ७ हजार कोटींच्या मदतीची अपेक्षा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळानंतर गुजरातला १ हजार कोटी रुपये दिले होते. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील नुकसान पाहता महाराष्ट्राला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना देखील सोबत घेणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.