गुलाब चक्रीवादळ आज धडकणार, पुढील 3 तासात राज्यात मुसळधार पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांना इशारा

दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं सनिवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटलं आहे की ‘गुलाब’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे किनारपट्टी भाग पूर्णपणे तयार आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा

  दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पुढील तीन तासात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  या जिल्ह्यांना रेड अलर्ट

  हवामान खात्याने सोमवारी पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांना सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

  मंगळवारी, रायगड, ठाणे, पालघर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.