वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी: नाना पटोलेची मागणी

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत.

  • युपीएच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते सातत्याने खोटे बोलत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्रा विरोधात कुभांड रचत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे, (गोकुळ) माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पटोले यांच्या निवासस्थानी झाले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, आ. संग्राम जगताप, आ. अमित झनक, रामकिशन ओझा, देवानंद पवार, बाळासाहेब सरनाईक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राची बदनामी नको

प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामे केली पाहिजेत. सरकारे येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत.

चुकीला माफी नाही

ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही.

आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

परमवीरसिंह, रश्मी शुक्ला प्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही, काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे, अशी माहितीही पटोले यांनी दिली.

राऊतांना युपीएबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे या शिवसेना खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल विचारत, शिवसेना ही युपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनियाजी गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये, असेही पटोले यांनी बजावले.