कोरोना निर्बंधासह दहशतवाद्यांच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर मुंबईत चोख बंदोबस्तात विसर्जन सोहळा!  

मागील वर्षी करोना संसर्गामुळे मुंबईतील अनेक मंडळांनी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कृत्रिम तलावांमध्ये त्यांचे विसर्जन केले होते. लालबाग राजासारख्या काही मंडळांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठाच केली नव्हती. यंदा जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांनी चार फुटांच्या गणेशमूर्ती विराजमान केल्या आहेत.

  मुंबई : अनंत चतुर्दशीला लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईत रात्री उशीरापर्यंत जल्लोषाचे वातावरण गेल्या वर्षी करोनाचा संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लोप पावले होते. यंदा मात्र अनेक प्रतिष्ठीत गणेश मंडळानी बाप्पांची प्रतिष्ठापना केली तर कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने निर्बंधांचे पालन करण्याची अट घातली आहे. त्यामुळे गर्दी टाळण्याबरोबरच दहशतवाद्यांच्या अटकसत्रा मुळे संभाव्य हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर विसर्जन मिरवणूकांची गर्दी होणार नाही याची पोलीस डोळ्यात तेल घालून काळजी घेताना दिसत आहेत.

  विसर्जनासाठी कडक पोलिस बंदोबस्त

  विसर्जनस्थळी, तसेच मार्गांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान आणि होमगार्डची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जनाच्या महत्वाच्या मिरवणूकांना वेळेत पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देत गर्दी टाळण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे.

  गर्दी रोखण्यासोबतच सुरक्षेला प्राधान्य

  मागील वर्षी करोना संसर्गामुळे मुंबईतील अनेक मंडळांनी पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून कृत्रिम तलावांमध्ये त्यांचे विसर्जन केले होते. लालबाग राजासारख्या काही मंडळांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठाच केली नव्हती. यंदा जवळपास सर्वच सार्वजनिक मंडळांनी चार फुटांच्या गणेशमूर्ती विराजमान केल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश मंडळे या मूर्तींची विसर्जन चौपाट्यांवर करणार असल्याने पोलिसांना ड्युटी चोख करावी लागत आहे. यासाठी विसर्जन मार्ग, तसेच चौपाट्यांवरील गर्दी रोखण्यासोबत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.

  मुंबई पोलिस ऑनड्युटी बंदोबस्तावर

  अनंत चतुर्दशीला मुंबई पोलिस ऑनड्युटी बंदोबस्तावर आहेत. त्याचबरोबर सशस्त्र विभाग आणि विशेष शाखांमधील १०० अधिकारी आणि दीड हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. एसआरपीएफच्या तीन तर, सीआरपीएफची एक राखीव तुकडी तैनात करण्यात आली आहे. ५०० होमगार्डसह बाहेरील युनिट्समधील २७५ कॉन्स्टेबलची मदत घेण्यात येत आहे.

  मुंबईत ‘ऑपरेशन ऑल आऊट’

  विसर्जनात विघ्न नको म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी एकदिवस आधीच मुंबईत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबविले. या मोहिमेत ५६ फरारी आरोपींना अटक करण्यात आली, तर अजामीनपात्र वॉरंट असलेल्या सुमारे ५५ जणांची धरपकड करण्यात आली. ११८ जणांवर ड्रग्ज सेवन तसेच विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली गेली. ३१ जणांकडून चाकू, तलवारी याप्रकारची शस्त्रे हस्तगत करण्यात आली. मुंबईतून तडीपार करूनही मुंबईत राहणाऱ्या ४१ आरोपींना पोलिसांनी अटक केली. २२२ ठिकाणी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ हाती घेऊन एक हजार ८४ रेकॉर्डवरील आरोपी तपासण्यात आले. याचबरोबर ठिकठिकाणी नाकाबंदी करून नऊ हजार २४५ वाहनांची झाडाझडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

  विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी

  विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई महापालिकेनेही जय्यत तयारी ठेवली आहे. विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्ती असाव्यात हे नियम पाळावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. शक्यतो लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई महापालिकेने १७३ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. तर घरगुती गणपतीची मूर्ती शाडु मातीची असेल तर घरीच विसर्जन करण्याची विनंतीही पालिकेने केली.