राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशनबाबत महत्त्वाचा निर्णय! सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचं सावट आणि विधान परिषद निवडणूक हेही कारणं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं मागील वर्षाप्रमाणं यावर्षी सुद्धा हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे.

    मुंबई : सलग दुसऱ्या वर्षी नागपूरला होणारे राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचं सावट आणि विधान परिषद निवडणूक हेही कारणं असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं मागील वर्षाप्रमाणं यावर्षी सुद्धा हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे.

    राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपूरला होतं. पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं.

    त्यानंतर यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवलं जाणार असल्याची चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    दरम्यान, याच बैठकीत करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.