राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना नारायण राणेंचे पत्र

राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी नारायण राणे यांनी अमित शाहा यांना पत्र लिहिलं आहे.

    मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्यानंतर विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. गृहमत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. याचं पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    मुकेश अंबानी यांच्यासारख्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसेचं राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी नारायण राणे यांनी अमित शाहा यांना पत्र लिहिलं आहे.

    दरम्यान अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्यानंतर NIA ने सचिन वाझे यांना ताब्यात घेतले असून, रोज नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे विरोधक सरकारवर आक्रमक झाले आहेत. तर या सर्व प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तर आता नारायण राणे यांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.