महामंडळ वाटपाचा तिढा सुटता सुटेना; महाविकास आघाडीत मतभेद

    मुंबई : मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. मात्र, या वाटाघाटीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या नियुक्त्या येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य

    शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीनंतर विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, समान सदस्यांना या महामंडळाच्या नियुक्त्यामध्ये सामावून घेण्यावरून काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नियुक्त्याबाबत निर्णय खोळंबला आहे.

    विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा

    अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यानंतर अध्यक्षपदावर आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी), तर सदस्य पदावर जयंत जाधव, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आदिक या राष्ट्रवादीच्या तर काँग्रेसच्या, डॉ एकनाथ गोंदकर, डी पी सावंत. सचिन गुजर, राजेंद्र भोतमागे, नामदेव गुंजाळ, संग्राम देशमुख यांची वर्णी लावण्यात आली आहे. सदस्यांमध्ये शिवसेनेचे रवींद्र मिर्लेकर (उपाध्यक्ष), राहुल कनाल, खासदार सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे यांचा समावेश आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशिवाय १५ सदस्य असतात. २००४ पासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंडळाची मुदत तीन वर्षांसाठी असते.