अवघ्या 31 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, आजचा दर किती? : जाणून घ्या सविस्तर

आतापर्यंत 31 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 8.06 आणि डिझेल 8.17 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.

  मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सुरुवातीला दिल्ली आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेल्या इंधन दरवाढीचा वणवा आता देशभरात पसरला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे.

  रविवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती. तर आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती.

  दरम्यान आतापर्यंत 31 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 8.06 आणि डिझेल 8.17 रुपयांनी महागले आहे. पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.

  महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

  मुंबई: पेट्रोल- 104.56, डिझेल 96.42
  पुणे: पेट्रोल- 104.15, डिझेल 94.54
  नाशिक: पेट्रोल- 104.91, डिझेल 95.27
  औरंगाबाद: पेट्रोल- 105.80, डिझेल 97.66
  कोल्हापूर: पेट्रोल- 104.66, डिझेल 95.06

  सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

  दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

  तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

  मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.