under construction

संपूर्ण मुंबईत २५ डिसेंबरपर्यंत नोंदविल्या गेलेल्या घरांची सरासरी जवळपास ५८५ इतकी आहे. तर, २७ ते ३० डिसेंबरपर्यंत घरांची नोंदणी दुपटीने वाढून १,११९ इतकी झाली. बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने ही सकारात्मक वाढ आहे. या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये देखील घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई — कोरोनामुळे झाकोळलेले मुंबईतील बांधकाम उद्योग पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत आहेत. कोरोना काळात ठप्प झालेली घरांची विक्री नोव्हेंबरनंतर आता डिसेंबरमध्येही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे नव्या वर्षांत या उद्योगाला नवी झळाळी मिळण्याची आशा बांधकाम व्यवसायातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे.
मुंबई हे इतर व्यवसायाप्रमाणेच बांधकाम क्षेत्रातही आघाडीवर आहे. मात्र मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्रदेखील बाधित झाले. सुरुवातीच्या कालावधीत घरांची नोंदणी रोडावली. नवीन नियोजित प्रकल्पदेखील ठप्प झाले. आता ही परिस्थिती हळूहळू बदलते आहे. गृहप्रकल्प उभारले जात असतानाच घरांची मागणीदेखील वाढत आहे. राज्य सरकारनेही बांधकाम क्षेत्रास साह्य करण्यासाठी मुद्रांक शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतल्याचा परिणामही झाल्याचे म्हटले जाते आहे. शिवाय नवीन वर्षाच्या १ जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात १ टक्के वाढ करण्याच्या निर्णय घेतल्याने डिसेंबर अखेरीस घरांच्या नोंदणीत भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून २८ ते ३० डिसेंबर अखेरीस ३,०५९ घरांची नोंदणीदेखील झाली आहे.


संपूर्ण मुंबईत २५ डिसेंबरपर्यंत नोंदविल्या गेलेल्या घरांची सरासरी जवळपास ५८५ इतकी आहे. तर, २७ ते ३० डिसेंबरपर्यंत घरांची नोंदणी दुपटीने वाढून १,११९ इतकी झाली. बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने ही सकारात्मक वाढ आहे. या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये देखील घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाईट फ्रॅंक कन्सल्टन्सीने घेतलेल्या आढाव्यानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राज्याच्या महसुलातही वाढ –
घरांच्या नोंदणीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्याच्या तिजोरीत भर पडत असते. यंदा मात्र कोरोनामुळे तिजोरीत पडू शकली नाही. तरीही सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने घरांच्या विक्रीत वाढ झाली. २०२० मध्ये घरांच्या नोंदणीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे ३,१०७ कोटी रुपये महसूल जमा झाला. त्यातील १,३५० कोटी रुपये महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्राप्त झाला. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०२० कालावधीत १,७५६ कोटी रुपये महसूल जमा झाला.
—–
घरांच्या विक्रीची स्थिती –
जानेवारी-६,१५०
फेब्रुवारी-५,९२७
मार्च-३,७९८
एप्रिल – शून्य
मे -२०७
जून -१,८३९
जुलै -२,६६२
ऑगस्ट -२,६४२
सप्टेंबर -५,९९७
ऑक्टोबर-५,५९७
नोव्हेंबर -९,३०१
डिसेंबर -१८,८५४