राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक ; नागरिकांमध्ये धाकधूक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाणार आहे. तसेच मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रूग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार की नाही? याबाबत या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मुंबई : राज्यात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाणार आहे. तसेच मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या प्रमुख शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रूग्णांचा आलेख वाढतच चालला आहे.

    लस आल्यामुळे कोरोना गेल्याचा संभ्रम अद्यापही लोकांमध्ये आहे. परंतु नागरिकांच्या या बेजबाबदारपणामुळे कोरोनाने पुन्हा एकदा राज्यात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली असून लॉकडाऊन होणार की नाही ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. आज याच मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे किंवा लॉकडाऊनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते.

    दरम्यान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश , आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांत कोरोनाची संख्या कमी झालेली दिसत आहे. सध्या पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहेत. त्यामुळे या राज्यांत कोरोनाची संख्या कमी ? आणि फक्त महाराष्ट्र राज्यातच कोरोनाची संख्या कशी काय वाढते? अशा प्रकारचे अनेक प्रश्न राजकीय स्तरातून उपस्थित केले जात आहेत.