अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा; अतुल भातखळकरांची पोलीस ठाण्यात तक्रार

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याविरोधात समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राने प्रचंड खळबळ उडवली आहे. त्या पत्रातून सिंह यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले आहे. या प्रकरणावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून अशा प्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधातच असा दावा करणे हे अतिशय गंभीर प्रकरण असून, या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी याविरोधात समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

    परमबीर सिंगानी केलेल्या आरोपामध्ये अनेक पुरावे आहेत. ते पुरावे नष्ट केले जाणाच्या शक्यता आहे. परमबीर यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे असं भातखळकर म्हणाले. त्यामुळे अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन सखोल चौकशी व्हावी अन्यथा २४ तासात गुन्हा नाही दाखल झाल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचा ईशाराही भातखळरांनी दिला.

    अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी  आंदोलन

    परमबीर सिंगानी केलेल्या आरोपावरुन राज्यातील विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. काल भाजपा आमदार प्रसाद लाड आणि नेत्या चित्रा वाघ यांनीही आंदोलन केलं होत. अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा केल्या होत्या.  मात्र त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल होतं. जो पर्यंत अनिल देशमुख राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरु राहणार असा ईशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.