गजानन मारणे रॉबिनहूड आहे का ? कोरोना काळात मिरवणूका काढतातच कशी; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झापले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोपींना आम्ही पॅरोलवर सोडत असताना दुसरीकडे आरोपीचे समर्थक मिरवणूका काढतात ? गजानन मारणे कोणी रॉबिनहूड आहे का ? अशी विचारणा खंडपीठाने मारणेंच्या वकिलांना केली.

    मुंबई : तळोजा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून महामार्गावर धुडगूस घातल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणेला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोपींना आम्ही पॅरोलवर सोडत असताना दुसरीकडे आरोपीचे समर्थक मिरवणूका काढतात ? गजानन मारणे कोणी रॉबिनहूड आहे का ? अशी विचारणा खंडपीठाने मारणेंच्या वकिलांना केली. पप्पू गावडे आणि अमोल बधे हत्याप्रकरणात २०१४ पासून कारागृहात अससेल्या गजा ऊर्फ गजानन मारणेची सात वर्षांनी आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

    गजा मारणे कारागृहाबाहेर आल्यानंतर गजाच्या समर्थकांनी त्याची मिरवणूक काढत पुण्याकडे जाताना महामार्गावर धुडगूस घातला. उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्यावर गजाविरोधात पुण्यातील पोलीस ठाण्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू उचलणे, तसेच मोक्का कायद्याअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले. आपल्या विरोधातील गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    दरम्यांन आरोपी गजा मारणेला त्याचे समर्थक महाराज संबोधतात त्याची तुरुंगातुन सुटका झाल्यावर समर्थकांनी `आला रे आला माझा बाप आला’ अशा घोषणाही दिल्या असल्याचे राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना अँड. अरुणा पै यांनी सांगितले. त्यावर कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. आरोपींना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून आम्ही आरोपींना पॅरोलवर सोडत असताना आरोपींकडून अशी गैरवर्तवणूक होते याबाबत खंडपीठाने मारणेच्या वकीलांना जाब विचारला मात्र, त्यावर उत्तर देण्यास मारणेंचे वकिल आबाद पौंडा अपयशी ठरले. त्याची दखल घेत खंडपीठाने सुनावणी ५ एप्रिलपर्यंत तहकूब केली.