शरद पवार यांच्या मागणीला ज्युलिओ रिबेरो यांचं उत्तर; मागणी फेटाळत ‘हे’ दिलं कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनीच या प्रकरणाची चौकशी करावी. त्यांना हा सर्व प्रकार माहित आहे, त्यामुळे त्यांनी या सर्व प्रकरणावर कारवाई केली पाहिजे. त्यांना कारवाई करावी लागेल कारण जनतेला आता या सर्व प्रकारचा तिटकारा आला आहे. असं रिबेरो यांनी म्हटलं.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुली करण्याचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आणि या प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी केली. शरद पवारांच्या या मागणीवर रिबेरो यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर मला चौकशी करण्याची ईच्छा नाही. माझं वय ९२ वर्ष आहे. आणि अशा पद्धतीच्या चौकशा करण्यासाठी मी आता सक्षम राहिलेलो नाही आणि जरी माझी क्षमता असती तरीही मी या चौकशीत पडलो नसतो. कारण हे प्रकरण माझ्यासारख्या व्यक्तीसाठीचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनीच या प्रकरणाची चौकशी करावी. त्यांना हा सर्व प्रकार माहित आहे, त्यामुळे त्यांनी या सर्व प्रकरणावर कारवाई केली पाहिजे. त्यांना कारवाई करावी लागेल कारण जनतेला आता या सर्व प्रकारचा तिटकारा आला आहे. असं रिबेरो यांनी म्हटलं.

    परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या प्रकरणात आता शरद पवारानी अनिल देशमुखांना पाठीशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जो पर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपा आंदोलन करणार असल्याचा ईशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय घडामोडी काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.