गणेशोत्सव मंडपांच्या आकारासाठी गेल्या वर्षीचेच मोजमाप; पालिका- मंडळांमध्ये खटके

कोरोनाच्या संकटामुळे (the corona crisis) गेल्यावर्षी अनेक गणेशोत्सव मंडळांनी (Ganeshotsav mandals) मंडपांचा आकार (the size of the mandals) लहान करून उत्सव साजरा केला. यंदा मात्र मोठ्या मंडपासाठी मंडळांना परवानगी देण्यास मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation) नकार दिला आहे.

  मुंबई (Mumbai) : कोरोनाच्या संकटामुळे (the corona crisis) गेल्यावर्षी अनेक गणेशोत्सव मंडळांनी (Ganeshotsav mandals) मंडपांचा आकार (the size of the mandals) लहान करून उत्सव साजरा केला. यंदा मात्र मोठ्या मंडपासाठी मंडळांना परवानगी देण्यास मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation) नकार दिला आहे. मागील वर्षी दिलेला मंडपासाठीचा आकार यंदाही काय़म ठेवावा, अशी पालिकेकडून मंडळांना सांगण्यात आले आहे. त्यावरून मंडळ कार्यकर्ते आणि पालिका प्रशासनामध्ये काही ठिकाणी खटके उडू लागले आहेत. डोंगरी, काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट रोड भागात असे वाद झाल्याचे आढळून आले आहे.

  गणपतीचे मंडप उभारताना रस्ते आणि फूटपाथवर अतिक्रमण होत असल्याने हा विषय सन २०१५ मध्ये उच्च न्यायालयात गेला होता. त्यावेळी न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेला मंडपांसाठी धोरण बनवण्यास सांगितले होते. त्यानुसार पालिकेने धोरण बनवले आहे. या धोरणानुसार यापूर्वी मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केले. कडक निर्बंधांमुळे त्यावेळी उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. राज्य सरकार आणि पालिकेने केलेल्या आवाहनानुसार जवळपास सर्वच मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा केला. गर्दी होऊ नये यासाठी मंडपांचा आकारही आधीच्या वर्षीपेक्षा लहान केला होता.

  यंदा अनेक मंडळांनी सन २०१९ मधील मंडपांच्या आकाराची परवानगी द्यावी यासाठी पालिकेकडे अर्ज केले असता प्रशासनाने ते फेटाळून लावले आहेत. डोंगरी येथील चिंचबंदर सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाने २०१९ मध्ये ६९×३३×२५ फूट आकाराचा मंडप उभारला होता. त्याच आकारासाठी २०२१ मध्ये परवानगी मागितली असता पालिकेने मंडळाला यंदाही कोरोनाचे संकट असल्याने गेल्या वर्षीच्या १५×२०×१५ फूट आकाराचा मंडप उभारावा अशी विनंती करत मोठ्या मंडपाची  परवानगी नाकारली आहे. तसे पत्र पालिकेच्या बी विभागाने मंडळाला दिले आहे.

  याच पद्धतीने काळबादेवी, चंदनवाडी सी विभाग, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, ताडदेव डी विभागातील मंडळांनाही मोठ्या मंडपांच्या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहिबावकर यांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनात पालिकेला सहकार्य करण्यासाठी असंख्य मंडळांनी मंडपांचे आकार लहान केले; याचा अर्थ त्यांचे मंडप प्रत्येक वर्षी लहान असतील असे नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

  लहान आकाराच्या मंडपात देखावे उभे कसे करणार?
  अनेक मंडळे सजावट, देखावे उभे करून उत्सव साजरा करतात. ही  परंपरा अद्याप कायम आहे. त्यामुळे अशी सजावट देखावे लहान मंडपात करणे शक्य नाही. मंडपांचे आकार पालिकेकडून कमी करून परवानगी दिली जाणार असेल तर तर ते योग्य नाही, असे समन्वय समितीने म्हटले आहे. दरम्यान, पालिकेने मागील वर्षी दिलेल्या मंडप आकारानुसार पुढील वर्षीच्या मंडप आकाराला परवानगी देण्याचा नियम आहे. त्यानुसार परवानगी दिली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.