“लोकल ट्रेन” ही  मुंबईकरांची जीवनवाहिनीचं !

गुरुवारी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयातून एका ब्रेन डेड दात्याचं यकृत आणि मूत्रपिंड परळ इथल्या खासगी रुग्णालयात एका दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन जायचं होतं, आणि कमीत कमी वेळेत हे दोन्ही अवयव लवकरात लवकर आणि सुरक्षित पोहचविण्याची गरज होती. अश्या वेळी रुग्णालय प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने एकत्र येत ही मोहीम यशस्वी फत्ते केली.

    दररोज लाखो प्रवाश्यांना वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडणारी आणि मुंबईला उपनगरांशी जोडणारी लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाईन म्हणजेचं जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. या लोकलला जीवनवाहिनी ही दिली गेलेली उपाधी खऱ्या अर्थाने मध्य रेल्वेने सार्थ करून दाखवलीय. गुरुवारी कल्याणमधील एका खासगी रुग्णालयातून एका ब्रेन डेड दात्याचं यकृत आणि मूत्रपिंड परळ इथल्या खासगी रुग्णालयात एका दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यासाठी घेऊन जायचं होतं, आणि कमीत कमी वेळेत हे दोन्ही अवयव लवकरात लवकर आणि सुरक्षित पोहचविण्याची गरज होती. अश्या वेळी रुग्णालय प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने एकत्र येत ही मोहीम यशस्वी फत्ते केली.

    मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकातून दादर स्थानकापर्यँत रेल्वेने हे अवयव आणण्यात आले. त्यासाठी रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ५५ मिनिटे लागली. यावेळी डॉक्टरांव्यतिरिक्त, मानवी अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याच्या टीममध्ये रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) जवान, कल्याण आणि दादर रेल्वे स्थानकाचे स्थानक प्रबंधक आणि काही कर्मचारी यांचा समावेश होता. यावेळी स्थानकावर उपस्थित आरपीएफ जवानांनी गर्दी हटवून प्रत्येक ठिकाणी वाट मोकळी करून दिली. मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ब्रेन डेड दात्याचे यकृत आणि मूत्रपिंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची पूर्ण व्यवस्था केली होती.

    २०१९ च्या सुरुवातीला देखील रेल्वेने ठाण्यापासून दादरपर्यंत यकृत नेण्यास मदत केली होती. त्यानंतर आता ही दुसरी वेळ आहे जेव्हा रेल्वेने अशीच कामगिरी बजावत एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी मदत करत “मुंबईची जीवनवाहिनी” ही सर्वसामान्यांनी लोकलला दिलेली उपाधी सार्थ ठरवून दाखवलीय .