मोठी बातमी : राज्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून संपाचा इशारा; रुग्णसेवाच व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता

आधीच कोरोनाचा कहर त्यात डॉक्टरांना आली लहर असंच म्हणायची वेळ प्रशासनावर असून प्रशासनाची धाकधूकही वाढली आहे. एकिकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार तर दुसरीकडे निवासी डॉक्टरांचा संप अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले आहे.

    Maharashtra Resident Doctors On Strike : मुंबई : ओमायक्रॉन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने राज्यात धिंगाणा सुरु केला आहे. अशातच राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आधीच कोरोनाचा कहर त्यात डॉक्टरांना आली लहर असंच म्हणायची वेळ प्रशासनावर असून प्रशासनाची धाकधूकही वाढली आहे. एकिकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार तर दुसरीकडे निवासी डॉक्टरांचा संप अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले आहे.

    काय आहेत मागण्या

    नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विद्यार्थी रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवरील ताण वाढलाय, अशातच नव्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळेच या डॉक्टरांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा या निवासी डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

    नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेची तारीख जाहीर होईपर्यंत संपाचा इशारा

    जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा सेंट्रल मार्डकडून देण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार असल्याची माहितीही मार्डकडून देण्यात आली आहे, त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोरील पेच वाढला आहे. राज्यात पुन्हा मोठी कोरोना आणि ओमिक्रॉनची रुग्णवाढ होत असल्याने सहाजिकच मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. अशावेळी प्रशासन या संपावर कसा तोडगा काढणार? हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.