एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार, काय कारवाई होणार, आतापर्यंत इतक्या जणांवर झालीये कारवाई; वाचा सविस्तर

सोमवारी हजर झाल्यास निलंबन रद्द करण्यात येईल, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले होते. कर्मचारी हजर न झाल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील अनिल परब यांनी दिला होता.

    मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटीचे कर्मचारी (ST Workers ) विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर (Strike) आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्माचाऱ्यांना अखेरची एक संधी म्हणून सोमवार म्हणजेच आजपर्यंत कामावर हजर होण्यास सांगितलं होतं. सोमवारी हजर झाल्यास निलंबन रद्द करण्यात येईल, असं परब म्हणाले होते.

    कर्मचारी हजर न झाल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील अनिल परब यांनी दिला होता. आज एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास काय कारवाई होणार हे पाहावे लागेल. एसटी महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं हा देखील पर्याय पूर्ण ताकदीनं वापरू शकतं. तर, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का हे पाहावं लागणार आहे.

    एसटी महामंडळाकडून बदली, निलंबन सेवासमाप्तीची कारवाई सुरु

    एसटी कर्मचारी कामावर परतत नसल्यानं महामंडळानं देखील त्यांच्यावर कारवाई सुरु ठेवली आहे. राज्यात आतापर्यंत 2250 एसटी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर, रोजंदारीवरील दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर, १० हजार १८० जणांचं निलंबन करण्यात आलं आहे.

    राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार?

    एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी संपाला सुरुवात केली. त्यानंतर राज्य सरकारनं सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या डीए, एचआरए मध्ये वाढ केली. तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवल्यानं त्यांच्या पगारात ४१ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही आंदोलन सुरुच असल्यानं एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर निलंबन, बदली आणि रोजदांरी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचारी पगारवाढ देऊनही कामावर परत नसल्यानं राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनिल परब यांनी दिलेली मुदत आज संपत असल्यानं राज्य सरकार कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

    रविवारी राज्यातील १२२ आगार अंशत: सुरु

    एसटी महामंडळाला रविवारी १२२ आगारातील वाहतूक अंशत: सुरु करण्यात यश आलं होतं. रविवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार रविवारी २११९ बसेस धावल्याची माहिती आहे.

    संप बेकायदा ठरवण्याचा प्रयत्न

    एसटी महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांना एकीकडे कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. तर, दुसरीकडे संप बेकायदा असल्याचं ठरवण्यासाठी कामगार न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. महामंडळानं कर्मचाऱ्याविरोधात कामगार न्यायालयात संदर्भ अर्ज दाखल केल्यानं त्यांना उत्तर द्यावी लागणार आहेत.