महाराष्ट्राचं महाबजेट! जयंत पाटील यांचा विक्रम तर शिंदेंनी 9 तर मुनगंटीवारांना 5 वेळा संधी; कोणत्या नेत्यांना किती वेळा मिळाली बजेट सादर करण्याची संधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थ, नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे सादर करतील. पवार यांनी सादर केलेले हे राज्याचे सातवे अंदाजपत्रक ठरेल(Maharashtra Budget Session 2022).

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थ, नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे सादर करतील. पवार यांनी सादर केलेले हे राज्याचे सातवे अंदाजपत्रक ठरेल(Maharashtra Budget Session 2022).

  कोरोना संपल्यानंतरच्या काळात व महाराष्ट्राच्या पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीला दोन वर्षांचा अवधी बाकी असताना अर्थमंत्र्यांपुढे विकासाला चालना देण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अर्थसाधने वाढवणे त्यांना क्रमप्राप्त ठरेल. मात्र कर वाढवण्यास फारसा वाव नाही. पण नवी अर्थसाधने तयार करून त्यातून भांडवली व पायाभूत खर्चासाठी वित्त उपलब्ध करण्याचे आव्हान मात्र पवार यांच्यापुढे आहे.

  सातव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

  दोन निवडणूक वर्षातील अर्धी अंदाजपत्रके किंवा लेखानुदान प्रस्तावांसह अजितदादांचे उद्याचे सातवे अंदाजपत्रक ठरते. 2011 पासून पवार अर्थखाते संभाळत होते. 2012, 2013 चे अर्थसंकल्प व 2014 मध्ये निवडणुकी आधीचे लेखानुदान त्यांनी सादर केले. मार्च 2020 मध्ये त्यांनी ठाकरे सरकारचे पहिले अंदाजपत्रक सादर केले. एकंदरीत असे दिसते की महाराष्ट्रात ज्या नेत्यांकडे अर्थ व नियोजन खात्यांची जबाबदारी दिली जाते ती त्या राजवटीत कायम राहते. सतत नव्या नेत्याकडे अर्थ-नियोजनाची जबाबदारी दिली जात नाही.

  जयंत पाटील यांचा विक्रम

  2011 पासून ते 2014 पर्यंत पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री होते. तत्पूर्वी सुनील तटकरे हे अर्थमंत्री म्हणून सुमारे दीड वर्षे कार्यरत होते आणि त्यांच्या आधी जयंत पाटील यांनी सलग दहा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे पहिले आघाडीचे सरकार 1999 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झाले तेंव्हापासून पाटील हेच सातत्याने अर्थखाते संभाळत होते. मार्च 2008 मध्ये त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विक्रमी असा दहावा होता. त्यानंतर त्यांच्याकडे गृह व पुढे ग्रामविकास खात्यांची जबाबादारी आली व त्यांच्या नंतर तटकरे व पवार यांच्याकडे हे खाते गेले.

  शिंदेंनी 9 तर मुनगंटीवारांना 5 वेळा संधी

  2014 ते 2019 या भाजपा शिवसेना राजवटीत सुधीर मुनगंटीवार यांनी सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला. जयंत पाटील यांच्या आधी सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला हाही तेंव्हा एक राष्ट्रीय स्तरावरचा विक्रम झाला होता. आता सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांच्याकडे कायम आहे.