निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

केंद्र शासनातर्फे निर्यात वाढीस चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती देऊन दानवे म्हणाले, निर्यातवाढीस चालना देणे ही केवळ उद्योग विभागाची जबाबदारी नसून यात अनेक घटकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. कोरोनाच्या संकटानंतर देशाची आर्थिक स्थिती आता हळूहळू पूर्ववत होत आहे. जागतिक क्रमवारीत देश ११व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर पोहचला आहे. ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

    मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून चारशे बिलीयन डॉलर  एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उदिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वपुर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे,कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथिल जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन दिवस चालणाऱ्या राज्यस्तरीय ‘वाणिज्य उत्सव’ या परिषदेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

    या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. येथील प्रदर्शन दालनांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विदेश व्यापार महानिदेशालयाचे (DGFT) अतिरिक्त महासंचालक एस बी एस रेड्डी, जेम्स ॲण्ड ज्वेलरी निर्यात परिषदेचे अध्यक्ष संजय शाह, जागतिक व्यापार केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री,  उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे उपस्थित  होते.

    निर्यातवाढीस चालना देणे ही सर्वांची जबाबदारी

    केंद्र शासनातर्फे निर्यात वाढीस चालना देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती देऊन दानवे म्हणाले, निर्यातवाढीस चालना देणे ही केवळ उद्योग विभागाची जबाबदारी नसून यात अनेक घटकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. कोरोनाच्या संकटानंतर देशाची आर्थिक स्थिती आता हळूहळू पूर्ववत होत आहे. जागतिक क्रमवारीत देश ११व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर पोहचला आहे. ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

    परिषदेतून महत्वाच्या सूचना अपेक्षित

    दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत होणाऱ्या चर्चासत्रांच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना येतील त्यांचे स्वागत केले जाईल असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिषदेसाठी दिला. मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरुपात पाठविलेल्या संदेशाचे वाचन अतिरिक्त मुख्य  सचिव बलदेव सिंग यांनी केले. अशा प्रकारच्या परिषदेच्या माध्यमातून नविन संकल्पना पुढे येतात, अनेक उद्योजकांना नवे मार्ग शोधता येतात त्यामुळे अशा परिषदांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हंटले आहे.

    स्वतंत्र निर्यात धोरण 

    देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा २५ टक्के आहे. केंद्र शासनाने भारतातून सुमारे चारशे मिलीयन डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर असेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष  देसाई यांनी व्यक्त केला. देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाने निर्यात क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वतंत्र निर्यात धोरण तयार केले आहे. निर्यात क्षेत्राला अधिक गतीमान करण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य अपेक्षित आहे.

    केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात औरंगाबाद येथे ऑरिक सिटी उभी  करण्यात आली आहे. या ठिकाणाहून तयार होणाऱ्या अधिकाधिक वस्तूंची निर्यात व्हावी, अशी अपेक्षा आहे. याशिवाय कोकणातील रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क सुरू केले जात आहे. ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग आहे.

    याद्वारे औषध निर्मिती क्षेत्रात देश स्वावलंबी होण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरेल. नवी मुंबई परिसरात जेम्स अँड ज्वेलरी उद्योगासाठी शासनाने भूखंड दिला आहे. त्यातून देशातील सर्वात मोठे जेम्स ज्वेलर्स पार्क उभे राहील, यात एक लाख कामगार काम करतील. लवकरच या केद्राचे उद्घाटन करू असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

    २० ते २६ सप्टेंबर या कालावधीत “वाणिज्य सप्ताह”

    “आजादी का अमृत महोत्सव”- ७५ व्या स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत दि.२० ते २६ सप्टेंबर या कालावधीत “वाणिज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील सुमारे दोनशे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

    यात, उद्योजक, निर्यात प्रचालन परिषदांचे पदाधिकारी, निर्यातदार, शासन विभागाचे अधिकारी इत्यादिंचा प्रामुख्याने समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग विभागाच्या संनियंत्रणाखाली DGFT या केंद्र शासनाच्या संस्थेच्या सहयोगाने व Gems and Jewellery Export Promotion Council (GJEPC)  आणि जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर)यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.