महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही : प्रविण दरेकर

राज्यात सर्व स्तरांवर आराजकता माजली आहे, भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणापासून राज्याचं राजकारण तापत आहे. आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. देशमुखांनी वाझेंना १०० कोटीच्या वसुलीचं टार्गेट दिलं आसा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यामुळे विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यातील विविध भागात भाजपाच्या वतीनं आंदोलनं करण्यात येत आहेत. यांचं पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    राज्यात सर्व स्तरांवर आराजकता माजली आहे, भ्रष्टाचार माजला आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, असं दरेकर म्हणाले. या प्रकरणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी मात्र आपण केली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. उद्या भाजपच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालंची भेट घेणार असल्याची माहिती त्यापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. दरम्यान डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत दबाव होता, असे परमबीर सिंग यांनी  म्हटले.

    त्याबाबत दरेकर म्हणाले की, केवळ तीन पक्षांनी चुकीच्या पध्दतीने हस्तगत केलेली सत्ता राखण्यासाठी वाटेल ते करा असा आग्रह आणि दबाव राज्य सरकारच्या नेत्यांचा होता. तेवढ्या भोवतीच राज्य सरकार फिरते आहे. त्यामुळे कोरोना स्थिती हाताळण्यातही सरकारचे लक्ष नाही. या सव्वा वर्षात राज्यात जनतेच्या प्रश्नाचा बोजवारा उडाला आहे असे ते म्हणाले. अन्य राज्यात कोरोनामधून बाहेर पडून अर्थ व्यवस्था गतिमान होत आहे. मात्र आपल्या राज्यात सरकारला यात यश आले नाही, असा आरोप त्यांनी केला. याबाबत राज्यपालांनी राष्ट्रपतीना अवगत करावे, असेही ते म्हणाले.