महेश मांजरेकरांचा ‘नाय वरणभात लोन्चा…’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल

‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो सोमवारी रिलीज झाला असून, चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केले असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. त्यामुळे मुंबईत सर्व स्तरातून या चित्रपटाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

    मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. महेश मांजरेकर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. या चित्रपटामुळं मुंबईसह राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. लालबाग -परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो सोमवारी रिलीज झाला असून, चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केले असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. त्यामुळे मुंबईत सर्व स्तरातून या चित्रपटाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तसेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

    दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरणभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथासंग्रहावर आधारीत हा चित्रपट आहे. मात्र, महेश मांजरेकर यांनी त्या नावामध्ये देखील बदल केला आहे. गिरणी कामगार आणि मराठीच्या मुद्यावर कायम आक्रमक असणारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत. मात्र, केंद्रीय महिला आयोगाने या वादग्रस्त प्रोमोची गंभीर दखल घेत चित्रपटातील संंबंधित दृश्य काढून टाकण्याची मागणी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाकडे करत त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळं आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

    दरम्यान, या चित्रपटात गिरणी कामगारांविषयी तसेच त्यांच्या कुटुंबांचे हिडीस आणि विकृत पद्धतीने चित्रीकरण केले आहे. महेश मांजरेकर यांच्याबाबतीत हे पहिल्यांदाच असे घडलेले नाही. याआधी देखील त्यांनी जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट काढला होता. त्यातही गिरणी कामगारांच्या अवस्थेचे अक्षरशः विकृत चित्रण केले होते. गिरणी कामगार संपामुळं देशोधडीला लागला होता, त्यानंतर त्यांची मुले गुन्हेगारीकडे कशी वळली, तसेच उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांच्या मुली देहविक्रिकडे कशा वळल्या आदी प्रकाश ‘लालबाग-परळ’ या चित्रपटात टाकण्यात आला आहे. दरम्यान आता ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या नव्या चित्रपटावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रोमोमधील काही दृश्यांवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.

    त्यामुळं आगामी काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार की, नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच गिरणी कामगारासाठी नेहमी पुढाकार घेणारी शिवसेना व मनसे मात्र यात कुठेच दिसत नसल्यामुळं नाराजी व्यक्त करणयात येत आहे. हा चित्रपट १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे, पण तत्पूर्वी वाद निर्माण झाल्यामुळं चित्रपट प्रदर्शित होणार की नाही याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.