Major accident during Ganesh Discharge in Mumbai; Five people drowned on Versova beach

    मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गणेश विसर्जन उत्साहात पार पडले. मात्र, मुंबईत गणेश विसर्जानादरम्यान मोठी दुर्घटना; वर्सोवा समुद्रकिनारी पाच जण बुडाले आहेत. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले. तिघांचा शोध सुरु आहे.

    रविवारी रात्री उशीरा वर्सोवा समुद्रकिनारी 5 मुले बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले.  उर्वरित तीन मुले अजून बेपत्ता आहेत. स्थानिक पोलीस, पालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून या बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे. तसेच नौदलाचीही मदत घेण्यात येत आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे मुलांचा शोध कार्यात अडथळा येत आहे. (Five children drowned during Ganpati immersion in Mumbai; Succeeded in rescuing two, while three are still missing)

    बीएमसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही मुले खोल पाण्यामध्ये बुडाली. ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन मुलांना वाचवले. यावेळी दोघांना वाचवण्यात यश आले. मात्र 3 मुलांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. गणपती विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या साहाय्याने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

    दरम्यान, पुणे जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान दोघे जण बुडाले आहेत. मोशी आळंदी रोडवर इंद्रायणी नदी पात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना ही दुर्घटना घडली.