मुली आणि नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप; विशेष सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्यातर्गत सुनावली शिक्षा

भांडुपमध्ये राहणाऱ्या नराधमाच्या ३२ वर्षींय मुलीला तिचा नवऱ्याने सोडून दिल्याने ती आपल्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत त्याच्याकडे राहत होती. ११ मे २०१७ रोजी तिच्या जन्मदात्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतरही १ जुलै २०१७ रोजी तिचे शोषण केले. तसेच कोणाकडे यासंदर्भात वाच्यता केली असता तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

    मुंबई : मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या ६५ वर्षीय नराधम बापाला मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

    भांडुपमध्ये राहणाऱ्या नराधमाच्या ३२ वर्षींय मुलीला तिचा नवऱ्याने सोडून दिल्याने ती आपल्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत त्याच्याकडे राहत होती. ११ मे २०१७ रोजी तिच्या जन्मदात्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतरही १ जुलै २०१७ रोजी तिचे शोषण केले. तसेच कोणाकडे यासंदर्भात वाच्यता केली असता तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, १० वर्षाच्या मुलीने आपल्यावर आजोबांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिला सांगितल्यानंतर मुलीने आपल्या बापाविरोधात भांडुप पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

    पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) आणि पोक्सो कायद्यातंर्गत नराधमावर गुन्हा दाखल केला आणि त्याला विशेष सत्र न्यायालयात न्या. रेखा पांढरे यांच्या समोर हजर करण्यात आले. तेव्हा, संपत्तीच्या वादातून मुलीने आपल्यावर चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा आरोपीच्यावतीने करण्यात आला. मात्र, ९ साक्षीदारांचे जबाब आणि दोघा मायलेकींचा वैद्यकीय अहवाल ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीची बाजू फेटाळून लावली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.