एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या

व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांचा सक्रिय सहभाग होता, असा दावा सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) कडून विशेष एनआयए सत्र न्यायालयात करण्यात आला. या प्रकरणात अधिक माहिती मिळावी यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. म्हणून तिघांनाही एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने तिघा आरोपींना २५ जूनपर्यत एनआयए कोठडी सुनावली.

    मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांचा सक्रिय सहभाग होता, असा दावा सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) कडून विशेष एनआयए सत्र न्यायालयात करण्यात आला. या प्रकरणात अधिक माहिती मिळावी यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. म्हणून तिघांनाही एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने तिघा आरोपींना २५ जूनपर्यत एनआयए कोठडी सुनावली.

    मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार उभी करणे आणि त्या कारचे मालक हिरेन मनसुख यांची हत्या करणे या प्रकरणात सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव अटक करण्यात आली आहे. सोमवारी विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. पी. आर. सित्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, शेलार आणि जाधव यांच्या चौकशीदरम्यान, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या केली असल्याचे सांगितले.

    एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला असल्याचेही त्यांनी कबूल केले असल्याची माहिती एनआयएच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली. सध्या सुनिल माने यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अन्य काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे त्यांची माहिती मिळविण्यासाठी माने यांचीही चौकशी करणे आवश्यक असल्याचा दावाही एनआयएकडून करण्यात आला. तसेच त्याची दखल घेत न्यायालयाने तिघांनाही २५ जूनपर्यत एनआयए कोठडी सुनावली.

    सदर प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडून वकिलांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यंची अट मान्य करत त्यांना रोज दुपारी १२ ते १२.२० यादरम्यान २० मिनिटे वकिलांना भेटण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.